कोकणमहाराष्ट्र

उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण

अलिबाग, दि. ५ :  किल्ले रायगडावर दि.01 जून ते दि.6 जून 2023 या कालावधीत 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

नुकताच दि.2 जून 2023 रोजी तिथीप्रमाणे 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

आता दि.6 जून 2023 रोजी तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठीचीही प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.
हा 350 व्या शिवराज्याभिषेकाचा प्रारंभ होत असून राज्य शासनाच्या वतीने किल्ले रायगडावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने गडावर दाखल होणार आहेत, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेवून सूक्ष्म नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व प्रशासनातील त्यांचे सर्व सहकारी, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने 33 समित्यांचे गठन केले असून या समित्यांच्या माध्यमातून गेली दोन महिने सोहळ्याचे नियोजन सुरु आहे.
गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करता येणार आहेत.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर काळा हौद येथे 1 लाख 50 लिटर, कोहीम तलाव येथे 1 लाख 50 लिटर, हनुमान टाकी येथे 1 लाख लिटर, गंगासागर येथे 1 लाख 50 लिटर, श्रीगोंडा येथे 1 लाख लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय पथके सर्व आरोग्य सोयीसुविधांसाह तैनात करण्यात आली आहेत. यात गडावर सहा, पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात आणि वाहनतळावरही वैद्यकीय सुविधा, पाणी, स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत.
गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गेच गडावर यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.
हृदयविकार, मधुमेह आणि श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच गडावर 109 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून जवळपास 2 हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
गडावर येणाऱ्या शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी 1 हजार पेक्षा जास्त दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गडावर फसाड पध्दतीची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वराज्याची राजधानी उजळून निघणार आहे.
याशिवाय गडाच्या पायरी मार्गावरही रात्री येणाऱ्या शिवभक्तांसाठी जास्त प्रकाश क्षमतेचे पथदिवे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर दगड किंवा दरडी कोसळण्याचा जिथे धोका आहे, त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या लावण्याचे काम करण्यात आले आहे.
पायरी मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मर्दानी खेळ, शाहिरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय आदेशानुसार पर्यटकांसाठी दि.5 व दि.6 जून 2023 रोजी रोप-वेची तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र जेष्ठ नागरिक, महिला, बालके तसेच दिव्यांगांना रोप-वे ची सुविधा उपलब्ध असणार आहे.
गडावर असलेल्या पाणी टंचाईमुळे रोप-वेचा वापर फक्त पाणी वाहतुकीसाठी व शासकीय वापरासाठी करण्यात येणार असल्याने येणाऱ्या शिवभक्तांची, पर्यटकांची गैरसोय होत आहे, याबद्दल रायगड रोप-वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनातर्फे मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे व वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह व शौचालय, स्वच्छता, कचरा, परिवहन, पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण,आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींच्या नियोजनासह शासन आणि प्रशासन आपली सेवा देण्यासाठी आणि आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. आपणही कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून रायगड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button