कर्जत येथील रक्षा संस्थेच्या सदस्यांनी वाचविले तीन युवकांचे प्राण !

अलिबाग, : कर्जत परिसरातील ढाक बहिरी येथे जाण्यासाठी कल्याण येथील शशांक पाटील, वय 17, हर्षल घावटे, वय 17, मोहित नारखेडे रा.कल्याण हे तीन युवक कर्जत येथून सांडशी येथे पोहोचले. तिथून पुढे काही काळ पायवाटेवर त्यांनी मार्गक्रमण केले परंतु काही चढ चढून गेल्यानंतर त्यांना पायवाट सापडली नाही. त्यानंतर त्यांनी एका कातळ कड्यावर चढून वर जाण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी ते अडकले. येथून त्यांना वरही चढून जाता येईना व खालीही उतरता येईना, अशा अवघड ठिकाणी ते अडकून पडले.
याबद्दलची माहिती प्रसिद्ध गिर्यारोहक श्री.गणेश गिध यांना मिळाली. त्यांनी याबद्दलची माहिती कर्जत येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाचे कार्यकर्ते श्री.अमित गुरव यांना दिली. या माहिती बरोबरच त्यांनी या युवकांचे लोकेशन व त्यांचे संपर्क क्रमांकही श्री.गुरव यांना दिले. हे युवक अडकल्याची माहिती मिळताच त्यांचे लोकेशन पाहून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना तयार राहण्यास कळविले व थोड्याच वेळात श्री.सुमित गुरव, राहुल कोनेकर हे सांडशी येथे जाण्यासाठी रवाना झाले.
बचाव पथकातील श्री.सुमित गुरव हे गिर्यारोहक असून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आपदा मित्र म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या “आपत्ती काळात मदत करण्यासाठी वायरलेस कम्युनिकेशन” या विषयाचेही प्रशिक्षण घेतले आहे.
दरम्यानच्या काळात श्री.अमित गुरव यांनी अडकलेल्या तीन युवकांना काही सूचना देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले, यामध्ये त्यांनी या युवकांना तुम्ही आत्ता आहात त्या ठिकाणीच थांबा, वर किंवा खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्याकडे असलेले पाणी थोड्या थोड्या वेळाने पीत राहा, शक्यतो सावलीमध्येच थांबा, बचाव पथक थोड्याच वेळात त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, अशा सूचना त्यांना केल्या. त्यांच्या मोबाईल मध्ये बॅटरी किती प्रमाणात शिल्लक आहे, याची माहिती घेऊन अधून मधून श्री. गुरव हे त्यांच्यासोबत फोनवरून संपर्कात होते.
कर्जत येथून बचाव पथक निघत असताना त्यांनी आपल्या सोबत गिर्यारोहणाचे सर्व साहित्य म्हणजे रोप, हर्नेस, डिसेंडर, विविध पद्धतीच्या कड्या, असेंडर, प्रथमोपचार पेटी, स्ट्रेचर, पाणी व खाण्याचे काही पदार्थ सोबत घेऊन निघाले. सांडशी मधून रविंद्र यांनाही त्यांच्यासोबत घेतले व अडकलेल्या तीन युवकांना पाणी पोहोचण्यासाठी त्यांनी भर उन्हात 39 डिग्री सेल्सिअस मध्ये ढाक बहिरीचा डोंगर चढण्यास सुरुवात केली. गुगल चे लोकेशन पाहून व त्या मुलांनी अडकलेल्या ठिकाणाचे केलेले वर्णन याची माहिती घेऊन काही वेळातच बचाव पथक त्या मुलांपर्यंत पोहोचले. या तीन युवकांपैकी एक युवक हा कडा चढून वर जाऊन अडकून पडला होता, तर दोन युवक हे कड्याच्या मध्यावर अडकून पडले होते. सर्व परिस्थितीचा अभ्यास करून बचाव पथकाने गिर्यारोहणाच्या साहित्याच्या मदतीने ढाक बहिरी येथील डोंगरामधील अडकलेल्या कड्यावरच्या तीनही युवकांना अतिशय सुरक्षितरित्या पायवाटेवर आणण्यात आले. त्यांना काही इजा झालेली नाही, याची खात्री केल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी देऊन सर्वजण सांडशी येथे सुरक्षितरित्या पोहोचले.
बचाव पथकातील श्री.सुमित गुरव हे गिर्यारोहक असून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आपदा मित्र म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून, आपत्ती काळात मदत करण्यासाठी वायरलेस कम्युनिकेशन याचेही प्रशिक्षण घेतले आहे.



