कोकणवासियांसाठी नितेश राणेंकडून दोन मोफत रेल्वे सेवा

- गणपती विशेष ‘मोदी एक्स्प्रेस’चा डबल धमाका
मुंबई, १३ ऑगस्ट २०२५ : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. गेली १२ वर्षे गणेशोत्सवा दरम्यान राबवण्यात येणारी परंपरा मंत्री नितेश राणे यांनी सुरू ठेवली आहे आहे. यानुसार यंदा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दोन विशेष गाड्या ‘मोदी एक्स्प्रेस’ नावाने धावणार असल्याची घोषणा केली आहे. या दोन्ही गाड्या गणेशोत्सवाला जाणाऱ्या कोकणातल्यांसाठी मोफत असणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणच्या जनतेने भाजप आणि राणे कुटुंबाला दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे यंदा ही सेवा दुप्पट करण्यात आल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.
गणेशभक्तांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, हे या उपक्रमाचं १३वं वर्ष आहे. या दोन स्पेशल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जेवण आणि पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवासाचे वेळापत्रक आणि मार्ग
या दोन्ही रेल्वे गाड्या दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणार आहेत.
- पहिली रेल्वे गाडी: शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सुटणारी ही गाडी रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबेल. या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल.
- दुसरी रेल्वे गाडी: रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुटणारी ही गाडी वैभववाडी आणि कणकवली येथे थांबेल.
तिकीट बुकिंगची माहिती
या स्पेशल ट्रेनसाठी तिकीट वाटप सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. प्रवाशांनी आपल्या विभागातील मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करून तिकिटासाठी अर्ज करावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. या ‘डबल धमाका’ मोदी एक्स्प्रेस सेवेचा लाभ सर्व कोकणवासियांनी घ्यावा असेही ते म्हणाले.



