कोकण रेल्वे मार्गे धावणारी वास्को पटना एक्सप्रेसही होणार ‘एलएचबी’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी वास्को ते पटना ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी पारंपरिक डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. हा बदल 15 ऑक्टोबर 2023 च्या फेरीपासून होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या देशभरातील नेटवर्कमध्ये धावणाऱ्या जुन्या गाड्यांच्या जागी एलएचबी तंत्रज्ञानावर आधारित गाड्या नव्या रेकच्या उपलब्धतेनुसार धावू लागल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या देखील जुन्या रेकच्या ऐवजी नवीन एल एस बी रेकसह धावत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील काही ठराविक गाड्याच जुन्या रेकसह चालवल्या जात आहेत.
गोव्यातील वास्को द गामा जंक्शन ते बिहारमधील पटना दरम्यान कोकण रेल्वे मार्ग धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस देखील आता एल एच बी होणार आहे.
वास्को ते पटना (12741) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून तर पटना ते वास्को (12742) या मार्गावर धावताना दिनांक 18 नोव्हेंबर 2023 च्या फेरीपासून ती एलएचबी श्रेणीतील डब्यांसह धावणार आहे.
कोणकोणत्या थांब्यांवर थांबते
गोव्यातील वास्को-द-गामा जंक्शन वरून सुटल्यानंतर मडगाव, थिवी, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण हे कोकण रेल्वे मार्गावरील थांबे घेत पनवेल कल्याण, नाशिक रोडमार्गे ती बिहारमधील पटना जंक्शनला जाते.



