कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या उधना-मंगळूरू एक्सप्रेसला २ जूनपासून अतिरिक्त डबा जोडणार!
गर्दीच्या हंगामामुळे रेल्वेने घेतला निर्णय
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेऊन यामागे धावणाऱ्या उधना- मंगळूरु एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपरचा एक कोच जादा जोडण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून सुरत जवळील उधना ते कर्नाटकमधील मंगळूर दरम्यान विशेष गाडी (09057/09058) चालवण्यात येत आहे.
उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे अवघड बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन उधना ते मंगळूर विशेष एक्सप्रेस ला दि. 2 जून 2024 च्या फेरीपासून तर मंगळुरू ते उधना या मार्गावर धावताना या विशेष गाडीला 3 जून 2024 रोजीच्या फेरीपासून स्लीपर श्रेणीचा आणखी एक डबा जोडण्यात येणार आहे.