कोकणमहाराष्ट्ररेल्वे

खेडवासीयांना रेल्वेकडून मिळू शकते ‘गूड न्यूज’

खेडवासियांचा जनरेटा वाढल्याने विविध शक्यतांची चाचपणी

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्याच्या दृष्टीने यशस्वीपणे  ‘ट्रायल रन’ घेण्यात आली आणि आता वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे कोकणवासियांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान खेडवासीय नागरिकांनी नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आता रेल्वेकडून खेडवासीयांना शुभ वार्ता मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावर रत्नागिरी- दिवा पॅसेंजर, दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी मांडवी आणि कोकणकन्या एक्सप्रेस अशा ठराविक गाड्या तसेच काही हॉलिडे एक्सप्रेस थांबत असल्यामुळे खेडसह या स्थानकावर अवलंबून असलेल्या दापोली, मंडणगड तालुकावासियांची प्रचंड गैरसोय होत आहे. गर्दीच्या हंगामात तर या स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखील गाडीत चढायला जागा मिळत नाही, अशी अवस्था होते. यातूनच या स्थानकावर गाडीत बसलेले व गाडीच्या बाहेरचे यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासावेळी तर या स्थानकावर प्रवाशांनी  गाड्या रोखण्यापर्यंतचे प्रकार झाले आहेत. मात्र तरीही कोकण रेल्वेकडून या स्थानकावर लोकांच्या मागणीनुसार पुरेशा गाड्या थांबा दिला जात नसल्यामुळे आता खेडवासीयांनी थेट नव्याने सुरू होणारी वंदे भारत एक्सप्रेस या स्थानकावर थांबवावी, असा आग्रह लोकप्रतिनिधींसह मंत्र्यांकडे धरला आहे. यासाठी कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्यालयाकडे देखील पाठपुरावा सुरू आहे. याचबरोबर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या माध्यमातून खेडवासीयांच्या गैरसोयीबद्दल रेल्वेमंत्र्यांपर्यंत देखील पत्रव्यवहार सुरू आहेत.

खेडला ‘वंदे भारत’ थांबणार की जनशताब्दी किंवा मंगला एक्सप्रेसला थांबा देणार?

कोकण रेल्वे मार्गावर येत्या काही दिवसात ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर खेडवासीयांनी थेट वंदे भारत एक्सप्रेस थांबा मागितल्याने आता कोकण रेल्वेकडून खेडवासीयांना गुड न्यूज मिळेल, असे संकेत मिळाले आहेत. माहितीनुसार खेडवासीय प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी या स्थानकावर नव्याने सुरू होणारी वंदे भारत थांबणार की आधीपासून मागणी असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसला खेड थांबा दिला जातो, याकडे प्रवासी जनतेचे  लक्ष लागले आहे. याबाबत  खेडवासीयांकडून सुरू असलेल्या जनरेटा आणि रेल्वेकडून सुरू असलेला विचारविनिमय या संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार कदाचित एर्नाकुलम ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दरम्यान रोज धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसला या स्थानकावर थांबा दिला जाऊ शकतो का, या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

जनशताब्दीला स्पीड अप केल्याने खेड थांबा देणे शक्य?

या संदर्भात उपलब्ध आणखी माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस प्रस्तावित असल्याने सध्या याच मार्गावर धावत असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसची वेगमर्यादा वाढवून ती वंदे भारत एक्सप्रेसच्या पुढे ठेवून निर्धारित  मडगावला नेण्याचा पर्याय शोधला जाऊ शकतो. तसेच जनशताब्दी स्पीड अप केल्यामुळे वाचलेल्या वेळात खेडला थांबा दिला जाऊ शकतो.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एक्सप्रेस गाडयांना खेड थांबा देण्याबाबतच्या मागण्या, त्यासाठीचा पाठपुरावा या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात  रेल्वेकडून या शक्यता गृहित धरून निर्णय घेतला जातो की, अन्य कोणत्या एक्सप्रेस गाड्यांना खेड थांबा देऊन खेडवासीय प्रवासी जनतेची मागणी पूर्ण केली जाते, याकडे आता प्रवासी जनतेचे लक्ष लागले आहे.

 

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button