गणेशोत्सवासाठी कोकणात पुरेशा जादा गाड्या सोडाव्या
खा. विनायक राऊत यांचे मध्य रेल्वेला पत्र ; साडेतीनशे जादा गाड्या सोडण्याची मागणी

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. मात्र, त्यांना रेल्वेचे कन्फर्म टिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एका मिनिटात गाडय़ांचे बुकिंग फुल होत असल्याने अनेकांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडत आहेत.त्यामुळे चाकरमान्यांची होणारी कोंडी फोडण्यासाठी गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर 350 जादा गाडय़ा सोडा, तसेच त्या गाडय़ांमध्ये सध्या वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेत केली आहे.
यंदा गणपतीचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. मात्र भल्या मोठय़ा वेटिंगच्या यादीमुळे त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्याची दखल घेत शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेत चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट काढताना येणाऱ्या आडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले.
तसेच दलालांच्या रॅकेटमुळे गाडीचे बुकिंग सुरू होताच फुल होत असल्याची बाब निदर्शनास आणत कारवाईची मागणी केली. तसेच गणेशोत्सव काळात चाकरमान्यांसाठी खास 350 जादा गाडय़ा सोडण्याची मागणी केली.



