गव्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वारसाला वन विभागाची २० लाखांची मदत प्रदान

देवरूख (सुरेश सप्रे) : चिपळूण तालुक्यातील मौजे तळसर (गुरववाडी) येथील ग्रामस्थ तुकाराम बडदे यांचा गवारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शासनाच्या नियमानुसार वन विभागातर्फे वारसांना दिली जाणाऱ्या नुकसान भरपाईचा ( रक्कम २० लाख रूपयांचा) धनादेश त्यांची पत्नी पार्वती बडदे यांना चिपळूणचे आम. शेखर निकम यांच्या हस्ते व वन विभागीय अधिकारी (चिपळूण) दीपक खाडे याचे यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात प्रदान करण्यात आला.
तुकाराम बाळु बडदे हे दिनांक 23/04/2023 रोजी सकाळी गावचे ग्रामदेवतेच्या मंदिरात पुजापाठ करणेस जात होते त्यावेळी रस्त्यात अचानकपणे समोर आलेल्या रानगव्याचा हल्ला होवून बडदे हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर अवस्थेमध्ये असताना त्यांना चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान चार दिवसानी तुकाराम बडदे यांचा मृत्यु झाला.
वन विभाग चिपळूण कडून सदर प्रकरणी आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन महाराष्ट्र शासन निर्णय क्र. डब्लुएलपी – 0718/प्र.क्र. 267/फ़-1 दिं. 23/08/2022 नुसार सदर प्रकरणास विभागिय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे यांनी तात्काळ 20,00,000/- मदत देणेस मंजुरी दिली. सदर प्रकरणात मौजे तळसरचे पोलिस पाटिल महेश कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. तुकाराम बाळु बडदे यांचे पश्चात त्यांची पत्नी श्रीमती पार्वती तुकाराम बडदे व पाच मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मंजुर करण्यात आलेल्या रक्कम रु.20,00,000/- (अक्षरी – वीस लाख रु. मात्र) पैकी रु.10,00,000/- (अक्षरी – दहा लाख रु. मात्र) धनादेशाद्वारे आज त्यांची पत्नी श्रीमती पार्वती तुकाराम बडदे यांना आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते अदा करणेत आली. तसेच भविष्याची तरतुद म्हणुन शासन निर्णयाच्या अधिन राहुन रक्कम रु. 5,00,000/- (अक्षरी – पाच लाख रु. मात्र) पुढिल पाच वर्षासाठी व उर्वरित रक्कम रु 5,00,000/(अक्षरी – पाच लाख रु. मात्र) पुढील दहा वर्षासाठी राष्ट्रियकृत बँकेत श्रीमती पार्वती तुकाराम बडदे यांचे नावे फ़िक्स डिपॉझिट म्हणून ठेवणेत आली आहे. सदर फ़िक्स डिपॉझिट सर्टिफ़िकेट श्रीमती पार्वती तुकाराम बडदे यांना आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते अदा करणेत आली. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, तालुका अध्यक्ष अबुशेट (नितिन ) ठसाळे, शौकत मुकादम, तळसर गावचे प्रथम नागरिक (सरपंच) स्नेहा पिटले, मुंढे गावचे सरपंच मयुर खेतले व तळसर गावचे ग्रामस्थ तसेच दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), वैभव बोराटे सहाय्यक वनसंरक्षक. रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती राजेश्री कीर परिक्षेत्र वन अधिकारी चिपळुण, दौलत भोसले वनपाल चिपळूण, राहुल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी, राजाराम शिंदे वनरक्षक रामपूर व वन कर्मचारी उपस्थित होते.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मनुष्य हानी किंवा शेतपिक नुकसानी झाल्यास, पाळिव पशुधन नुकसानी झाल्यास नजिकच्या वनविभाग कार्यालयास तत्काळ संपर्क साधावा, असे मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे यांनी केले आहे.



