गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण गोगटे यांना स्मृतिदिनी अभिवादन
रत्नागिरी : एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
अगणित विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांच्या कार्याला कै. नारायण रघुनाथ गोगटे यांनी आपल्या दातृत्वाने हातभार लावला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या खडतर वाटचालीमध्ये संस्थेला देणगी देऊन कै. नारायण गोगटे यांनी मोलाचे योगदान दिले.
कै. नारायण गोगटे यांच्या स्मृतिदिनानमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचा सुरुवातीचा काळ ते महाविद्यालय नावारूपाला येऊन स्वायत्त दर्जा प्राप्त होणे या आठवणींना उजाळा देताना कै. नारायण गोगटे यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले. महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये आणि जाणीव समृद्ध करून शिक्षकांनी नि:स्वार्थपणे कार्य करावे, असे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. आदिती जोशी यांनी केले. कार्यक्रमास कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, प्रबंधक श्री.रवींद्र केतकर, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.