चिपळूणच्या लो. टिळक स्मारक वाचन मंदिराचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
रविवारी सायंकाळी ६ वाजता बाळशास्त्री जांभेकर सभागृहात वितरण होणार
चिपळूण : कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये, कविवर्य माधव केशव काटदरे आणि कविवर्य वि. ल. बरवे उर्फ कवी आनंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘लो.टि.स्मा.’ वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. येत्या रविवारी (दि. २१) सायंकाळी ६ वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
२०२१-२२ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार “माझ्या हयातीचा दाखला” या कविता संग्रहासाठी कविवर्य डॉ. विशाल इंगोले (लोणार, बुलढाणा), २०२२-२३ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार “आतल्या विस्तवाच्या कविता” या कविता संग्रहासाठी कविवर्य संजय चौधरी (नाशिक), २०२१-२२ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मनबोली कादंबरी पुरस्कार “ओरबिन” या कादंबरीसाठी कादंबरीकार गजानन यशवंत देसाई (गोवा), २०२२-२३ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मनबोली कादंबरी पुरस्कार “कलविण” या कादंबरीसाठी कादंबरीकार रामकृष्ण मगदूम (आजरा, कोल्हापूर), कथासंग्रहासाठीचा कवी माधव पुरस्कार “लॉकडाऊन” या कथासंग्रहासाठी साहित्यिका संध्या साठे जोशी (चिपळूण), कविता संग्रहासाठीचा कवी आनंद पुरस्कार “सूर्योदय” या कविता संग्रहासाठी कवयित्री ममता विचारे (गुहागर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्यप्रेमींनी या पुरस्कार वितरण सोहोळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.