चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात १५४७ जणांना पहिले प्रशिक्षण
- प्रशिक्षण हे खूप महत्वाचे, त्यावरच यश : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. ८ : कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्वाचे असते. या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
46 रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघांतर्गत 265 चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे पहिले प्रशिक्षण चिपळूण मधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात काल पार पडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसिलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते.
मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांनी काटेकोरपणे लक्ष देऊन करावे. त्यात कोणतेही अडचण येणार नाही. मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दरम्यान केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा. मतदान प्रक्रिया दरम्यान काय करावे आणि काय करु नये, हे सर्वात महत्वाचे असते. त्यादृष्टिने सर्वांनी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यानीही यावेळी मार्गदर्शन केले.
प्रांताधिकारी श्री. लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरण करुन अभिरुप मतदान प्रमाणपत्र नियंत्रण युनिट मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची कार्यवाही, इलेक्ट्रान मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट बदलणे आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांना केले.
पहिल्या 747 तसेच दुसऱ्या सत्रात 800 अशा 1547 जणांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले.