जीते रहो ‘ अजित ‘ रहो अजित!!
आनंद कौतुक अभिमान समाधान अशा अनेक वेगवेगळ्या भावनांनी मन भरून येते आहे.
ग्रामीण भागातील अत्यंत बेताच्या परिस्थितीतील एखाद्या मुलाने आपल्या अंगभूत गुणांना ओळखून त्यांना आपल्या कल्पनांची संकल्पाची जोड देऊन, आपला आवाका ओळखून, योग्य सीमा रेषांनी स्वतःच्या जीवन चित्राची चौकट आखावी. त्यात आपल्या स्वैर मनस्वी विचारांना मोकळ्या संचाराची संधी देत स्वतःच्या मर्यादा सांभाळत आपली कारकिर्द रेखाटावी. ठरवलेल्या दिशाबद्ध कारकिर्दीत कठोर मेहनत, अपार परिश्रमाचे रंग भरत भरत योग्य संयमित रंगसंगतीने जीव ओतावा. नेमकेपणाने प्रमाण बद्धतेने त्यास अपेक्षित स्वरुप आणावे आणि असं सर्वार्थाने नियोजनबद्ध आपलं पूर्णत्वास आलेलं देखणं व्यक्तिचित्र चित्र लोकांसाठी भव्य स्वरुपात मोठ्या आणि मानांकित ठिकाणीप्रदर्शित करावं!!
हा पराक्रम करून दाखवणाऱ्या कलाकार माणसाचं नाव चित्रकार,शिक्षक श्री.अजित भगवान मते!
जा स्नेही मंडळींच्या असण्याने, त्यांचा सहवास मिळाल्याने आपल्याला स्वतःला अतिव समाधान आनंद मिळतो अशा स्नेही मंडळींपैकी जमिनीवर पाय असणारा साधेपणा जपणारा चित्रकार मित्र म्हणजे अजित मते. वास्तविक सावर्डे येथील चित्रकला महाविद्यालयात मला एक वर्ष जुनियर असणारा हा कलाकार मित्र चित्रकलेत मात्र मला सिनियर झाला आहे याचा मला खूप खूप अभिमान आहे. पारंपरिक शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील घरची बेताची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या भावाच्या खंबीर आधाराच्या जोरावर मन लाऊन पूर्ण केलेलं चित्रकलेचे प्रशिक्षण, प्रशिक्षणाचा उपयोग करून खडतरपणे मिळवलेली उपजीविकेसाठीची नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी दिवसभराचं कामकाज सांभाळून देखील जपलेली स्वतःमधील चित्रकार म्हणून भरीव कामगिरी करून दाखवण्याची असणारी उर्मी.. हे सगळं अत्यंत कौतुकास्पद आहे.
जलरंग हे अवघड माध्यम प्रभावीपणे हाताळून लँडस्केप(निसर्गचित्र) आणि रचनाचित्र अर्थातच कॉम्पोझिशन अशा विषयांमध्ये विशेष रुची असणारा हा अवलिया कलाकार अजित मते!
सावर्डे जवळील दहिवली बुद्रुक हे मूळ गाव असणाऱ्या अजित मते याचे My Lord 2024 या विषयावरील रचनाचित्रांचे प्रदर्शन दिनांक ०७ ते १३ मे २०२४ या कालावधीत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी, मुंबई येथे संपन्न होत आहे.
अजितची अशी अनेक चित्र प्रदर्शने होत राहोत त्याची कला वृद्धिंगत होत राहो अशी त्याच्याच चित्रांचा मध्यवर्ती विषय असलेल्या My Lord अर्थात सर्वसाक्षी परमेश्वरा चरणी प्रार्थना आणि सदिच्छा!!
–पराग गजानन लघाटे
कलाशिक्षक, युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण.
आवश्यकतेनुसार शांत शीत रंग संगती आणि काही ठिकाणी उष्ण रंग संगतीचा आणि रंग आकारांचा अत्यंत परिणामकारक उपयोग करून आपल्या अनेकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या श्रद्धास्थानांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न अजितने या चित्रांमध्ये केला आहे. पोत निर्मितीच्या उद्देशाने अत्यंत बारीक बारीक रेखीव प्रकारचे केलेले काम हे या चित्रांचे वैशिष्ट्य सांगता येईल.
- हे देखील वाचा : मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये उमटणार कोकणी कलेची छाप!
- Konkan Railway | नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या फेऱ्या जून अखेरपर्यंत वाढवल्या
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटाचा पर्याय उपलब्ध
अजितचे हे चित्रकला प्रदर्शन म्हणजे अजितसाठी, त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि आम्हा त्याच्या मित्र परिवारासाठी जणू एखादा उत्सवच आहे. म्हणूनच आनंद कौतुक अभिमान समाधान अशा अनेक वेगवेगळ्या भावनांनी मन भरून येते आहे.