दापोलीत सायकल फेरीद्वारे तंत्रज्ञान दिवस साजरा
दापोली : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार, १२ मे २०२४ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरी दरम्यान वळणे एमआयडीसी येथील काही औद्योगिक कंपन्यांना भेट देऊन तिथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, उदयनगर, वडाचा कोंड, जालगाव बाजारपेठ, वळणे एमआयडीसी, आझाद मैदान असा १२ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. वळणे एमआयडीसी येथील त्रिमूर्ती प्लास्टिकचे अरुण नरवणकर यांनी प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची, उपकरणांची माहिती करुन दिली. अजरालय ऍग्रो इंडस्ट्रीजचे श्रवण दांडेकर यांनी कोकोपीट, काथ्या, सुंभ, कोकेडामा इत्यादी कृषी उत्पादने, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली. ओरा ग्लास फायबरचे अंकित वाराणकर यांनी ग्लास फायबर, मोल्डिंग वस्तू इत्यादींचे आणि बालाजी पावडर कोटिंगचे जांगीड यांनी पावडर कोटिंग तंत्रज्ञान बद्दल सांगितले, मशिन्स दाखवल्या. ग्रोवर्स गेट नर्सरीचे हृषीकेश मयेकर यांनी विविध शोभेच्या रोपांबद्दल माहिती दिली. अरुणश्री फार्म फूडचे राजन साखळकर, कोकण फळप्रक्रिया काजू फॅक्टरीचे धनंजय यादव, सिटी कुल आइस्क्रिम व सुरुची फूड्सचे प्रवीण कलाल यांनी वेगवेगळ्या फळांवर प्रकिया करुन बनवले जाणारे पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले. आइस्क्रिम कसे बनवले जाते ते दाखवले. सर्वांनी येथे बनलेल्या काजू पदार्थ, कैरी पन्हे, कोकम सरबत, आइस्क्रिम इत्यादींचा आस्वाद घेतला.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात राजेशकुमार कदम, अंबरीश गुरव, सचिन खटावकर, सुधिर चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.