रोहा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

अलिबाग : उपविभागीय अधिकारी कार्यालय, रोहा यांच्या वतीने दि.21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन तालुका क्रीडा संकुल धाटाव, रोहा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या योग शिबिरास योग प्रशिक्षक श्रीमती विभा चोरगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी जीवनात असलेले योगाचे महत्त्व सांगून योगाचे प्रात्यक्षिक घेतले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड, तहसिलदार श्री.किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.ससाणे, जाधव नर्सिंग होमचे श्री.अशोक जाधव, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल, लायन्स क्लब ऑफ रोहा, मेडिकल अँड चॅरिटेबल असोसिएशन यांचे प्रतिनिधी, रोहा व परिसरातील नागरिक, शासकीय अधिकारी/कर्मचारी, व्यावसायिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुटवड यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम व योगा यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली आणि नियमित व्यायाम, योगा करून आरोग्याकडे लक्ष देण्यासंदर्भात उपस्थितांना आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी यंग युनिटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुटवड आणि तहसिलदार श्री.किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री.भरत सावंत, तलाठी श्रीमती म्हशेलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



