
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसला जोडलेले विस्टाडोम कोच रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर घालत असल्याचे निदर्शनास आल्याने मुंबई -मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला अलीकडेच दोन विस्टाडोम कोच जोडण्यात आले आहेत. रेल्वेने विस्टाडोम कोचचा हा प्रयोग सदा सर्वकाळ प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादासह धावणाऱ्या सावंतवाडी -दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसच्या बाबतीत करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी किंवा तेजस एक्सप्रेस न थांबणाऱ्या थांब्यांवरील प्रवाशांना विस्टाडोम कोचकडे आकर्षित केल्यामुळे रेल्वेला आपल्या महसुलात भर घालता येईल असे सुचवण्यात आले आहे. या संदर्भात मध्ये तसेच कोकण रेल्वेकडे पत्र पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
विस्टाडोम डब्यांना सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. देशभरात ज्या ज्या मार्गांवर हे डबे जोडण्यात आले ते सर्व भरून जात आहेत. कोकणच्या निसर्गसौंदर्यामुळे इथे आणखी जास्त मागणी आहे. मध्य रेल्वेने हल्लीच तेजस एक्सप्रेसला दोन विस्टाडोम जोडले आहेत. त्याच धर्तीवर कोकण रेल्वेनेही दोन्ही दिशांना दिवसा धावणाऱ्या १०१०५/१०१०६ सावंतवाडी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसलाही असा एक डबा जोडण्याचा प्रयोग करुन पहावा अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. येत्या गणेशोत्सवापासून याची सुरुवात करून पुढील उन्हाळ्यापर्यंत तो ठेवल्यास नेमका प्रवासी प्रतिसाद किती आहे ते पाहता येईल. त्यानुसार पुढील निर्णय घ्यावा, असे रेल्वेला सुचवण्यात आले आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त स्थानकांतील प्रवाशांना पर्यटन पारदर्शक डब्यांचा लाभ घेता, येईल व संबंधित स्थानकांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल असे रेल्वेला सुचवण्यात आले आहे.
… तर एसी चेअर कारने सुरुवात करावी
दिवा सावंतवाडीच्या विस्टाडोमच्या लोकप्रियतेबाबत शंका असल्यास एसी चेअर कारने सुरुवात करावी, असेही रेल्वेला पाठवलेल्या पत्रात सुचवण्यात आले आहे. विस्टाडोम कोचला प्रवाशांची मिळत असलेली पसंती पाहून ही मागणी करण्यात आली आहे.



