दुर्गम भागातल्या चिमुकल्यांच्या चेहेऱ्यावर फुलले हास्य!

- जायंट्स् ग्रुप ऑफ कुवरबाव सहेली मार्फत मोफत दंत चिकित्सा उपक्रम
रत्नागिरी : शहरी वातावरणापासून दूर एका दुर्गम भागातली एक शाळा. नाखरे गावातल शेवटच टोक. या दुर्गम भागातल्या शाळेत पोचले दंतचिकित्सक आणि त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

ना मोबाईल टॉवर, ना नेटवर्क, गावात जाणाऱ्या मोजून तीन बस, अगदी आडबाजूला असणारी ही जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे कालकर कोंड शाळा. पहिली ते सातवी मिळून फक्त ३६ मुलं. कोणतीही सुविधा इथे पोचणं अगदी कर्मकठीण. मात्र २१ जानेवारी हा दिवस इथल्या या मुलांसाठी खास होता…कारण फारस कोणी न जाणाऱ्या त्या शाळेत शहरातून एक डॉक्टर त्यांच्या भेटीला गेले होते. निमित्त होत…लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत जायंट्स् ग्रुप ऑफ कुवरबाव सहेली मार्फत दंत चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबीर तसंच महिला पालक वर्गासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचं.
अत्यंत आडगावात असणाऱ्या या शाळेतल्या मुलांना हा कार्यक्रम म्हणजे जणू एक आनंदमेळाच होता. डॉ. ऋषिकेश जोशी यांनी अंगणवाडी आणि शाळेतील सर्व चिमुकल्यांची मोफत दंत तपासणी केली. त्याचवेळी जायंटस ग्रुप ऑफ कुवरबाव सहेलीच्या अध्यक्षा मेघना परांजपे, फेडरेशन डायरेक्टर सौ. सुवर्णा चव्हाण आणि सौ. अनुया बाम यांनी त्यांना टूथपेस्ट आणि खाऊच वाटप केलं. यावेळी डॉ. जोशी यांनी दातांच्या स्वच्छतेबद्दल माहिती दिली आणि छान गप्पा मारत त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयींबाबत मार्गदर्शन केलं. अत्यंत कष्ट करत आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी झटणाऱ्या उपस्थित सर्व महिला पालक वर्गासाठी या निमित्ताने हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही जोशी, श्री. लिंगायत सर, श्री. पावसकर सर या शिक्षकांनी सहकार्य केले. अत्यंत दुर्गम असणाऱ्या या शाळेत असेच नवनवीन उपक्रम अवश्य राबवण्यात यावेत अशी मागणी यावेळी उपस्थित सर्व महिला पालकवर्गाने जायंट्स् ग्रुप ऑफ कुवरबाव सहेलीकडे केली.



