देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त उपक्रम

देवरूख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. धनंजय दळवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पूजन करत अभिवादन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यिक म्हणून असणारे योगदान, आत्मचरित्रकार म्हणून त्यांच्या लेखन शैलीचा वेगळेपणा, मराठी भाषाशुद्धी व लिपी शुद्धीसाठी केलेले महत्त्वपूर्ण कार्य, गाजलेली गीते व इतर साहित्य याचा समग्र आढावा प्रा. सिमि शेट्ये यांनी घेतला. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीपर गीत प्रथम शिंदे, साक्षी गवंडी, अमित कुलकर्णी, प्रा. सीमा शेट्ये यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली
प्रा. धनंजय दळवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसेनानी, समाज सुधारक, राजकारणी, तत्त्वज्ञ, मराठी लेखक व कवी म्हणून केलेल्या उपयुक्त कार्याचा सखोल आढावा घेतला. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय व प्रसिद्धी विभाग यांनी संयुक्तपणे केले होते.
विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची माहिती व्हावी, यासाठी विविध वर्गांच्या व्हाट्सअप ग्रुपकरीता सावरकरांनी लिहिलेली पीडीएफ स्वरूपातील पुस्तके, शॉर्ट फिल्म, हिंदी पिक्चर, व्याख्यान ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी उपलब्ध करून दिले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमित कुलकर्णी यांनी केले.



