देश हिताचे ठेऊनी भान, चला करु मतदान !
- पत्रव्यवहारात मतदान जनजागृती घोषवाक्याचा वापर करा : जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे
रत्नागिरी, दि. 4 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडील कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर कार्यालयीन पत्र व्यवहारावर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
सर्व सहाय्यक निबंधक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक, रत्नागिरी अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागरी/ग्रामीण/नोकरांच्या सहकारी पतसंस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना याबाबत डॉ. शिंदे यांनी पत्र पाठविले आहे.
या पत्रात म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी ही ७५ पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयात, बँक, सहकारी पतसंस्था, बाजार समितीमार्फत निर्गमित होणाऱ्या तसेच प्राप्त होणाऱ्या पत्र/अर्जांची नागरिकांना/सभासदांना/शेतकऱ्यांना दुय्यम प्रत (पोच ) देताना त्यावरती निवडणूक आयोगाकडील ‘देश हिताचे ठेवून भाग, चला करु मतदान !’, ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा..’ कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर मतदानाच्या तारखेपर्यंत करावा, असे म्हटले आहे.