मत्स्यगंधा एक्सप्रेस नऊ तास विलंबाने सोडणार!
रत्नागिरी/मुंबई : पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र शनिवारी झालेल्या या अपघातामुळे तब्बल एक्सप्रेस गाड्यांना फटका बसला असून ११ गाड्या रेल्वेला रद्द कराव्या लागल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास मालगाडी घसरून रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. यामुळे एक्सप्रेस 31 गड्यांना फटका सहन करावा लागला आहे.
या संदर्भात मध्यरेल्वेकडूनप्राप्त माहितीनुसार ११ गाड्या रद्द कराव्या लागल्या तर दहा गाड्या पर्यायी मार्गाने वळवाव्या लागल्या आहेत. दोन एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या सुधारित वेळापत्रकानुसार चालवल्या जात असून तीन गाड्यांचा प्रवास त्यांच्या निर्धारित शेवटच्या स्थानकाच्या आधीच संपवावा लागला आहे. याचबरोबर पाच एक्सप्रेस गाड्या या निर्धारित स्थानकावरून सोडण्याऐवजी अपघात झालेल्या स्थानकाच्या आधीच्या स्थानकापासून सोडाव्या लागल्या आहे.
तेरा गाड्या थांबवल्या
मालगाडीला झालेल्या या अपघातामुळे येणाऱ्या 7 तसेच जाणाऱ्या 6 अशा तेरा गाड्या या विविध स्थानकांवर रोखून ठेवाव्या लागल्या आहेत.
मत्स्यगंधा एक्सप्रेस सुमारे नऊ तास विलंबाने धावणार
कोकण रेल्वे मार्ग धावणारी 12619 एलटीटी -मंगळूर ही डाऊन मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडी सुधारित वेळापत्रकानुसार दि. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे. निर्धारित वेळेनुसार र ही गाडी दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार होती.