कोकणमहाराष्ट्र

प्रज्वला ठाकूर बँक ऑफ महाराष्ट्र नवघर समोर करणार ‘भीक मांगो’ आंदोलन

  • नवघरमधील खातेदारांच्या ३१ लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण
  • उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरीही प्रज्वला ठाकूर न्याया पासून वंचित

उरण दि. २४ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यावरील ३१ लाखांची रक्कम परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात नवघर येथे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेस यांच्या विरोधात दिनांक २२/४/२०२३ रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पोलिसांमार्फत तसेच बँकेशी संबंधित विभागा मार्फत तपास संथ गतीने चालू आहे.आरोपी मात्र फरार आहेत. त्यांच्यावर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तब्ब्ल ४ महिने उलटूनही भेंडखळच्या प्रज्वला ठाकूर यांना न्याय न मिळाल्याने दि. २८/८/२०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर समोर प्रज्वला ठाकूर या भिक मांगो आंदोलन करणार आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रज्वला ठाकूर (फिर्यादी ) यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखा येथे बँक खाते आहे. त्यांनी मुलीच्या नावे २० लाख रुपयांची एफडी करावयाची असल्याचे सांगितले. एफडी करण्यासाठी बँक कर्मचारी मकरंद भोईर याच्यावर विश्वास ठेवून चेक बुक व पास बुक त्याच्याकडे दिले. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही फिर्यादीला एफडी प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी २७/२/२०२३ रोजी बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्या खात्यावर अवघी २४ हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम असल्याचे निदर्शनास आले. बँक मॅनेजर यांनी फिर्यादीला बचत खात्याचा तपशील समजवून सांगितला असता त्यांच्या खात्यावरील २० लाख दि. २७/६/२०२२ रोजी व रुपये १० लाख दि. २१/१०/२०२२ रोजी आरोपी चेतन इंटरप्रायझेस या खात्यावर जमा झाल्याचे दिसते तर रुपये १ लाख दि. ६/१०/२०२२ रोजी आरोपी मकरंद भोईर याने काढून घेतल्याचे उघड झाले आहे. यावरून बँक कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेसचा खातेदार यांनी संगनमताने फिर्यादीची एकूण ३१ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात २२/४/२०२३ रोजी दाखल झाला आहे.

या प्रकरणी आरोपी विरोधात भादवी कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज सोनवणे यांनी तपास केला. आता तपास श्री. हुलगे यांच्याकडे आहे.बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग करताना महाराष्ट्र बैंक नवघर शाखेच्या मॅनेजर किंवा इतर कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड होते, अन्यथा त्यांचा ही यामध्ये हात असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.दोषीवर त्वरित कायदेशीर कारवाई करून सदर रक्कम त्वरित मिळावे अशी मागणी प्रज्वला ठाकूर यांनी केली होती. मात्र बँक प्रशासनाने पीडित व्यक्तीला न्याय द्यावयाच्या ऐवजी तिचे आर्थिक शोषण करून तीच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर येथे कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरु आहे. अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक १५ ते २० बँक खातेदार असलेल्या व्यक्तींची झाली आहे.पण हे फसवणूक झालेले व्यक्ती आपली फसवणूक झाली आहे असे सांगण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे वारंवार ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघरच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून सर्व व्यक्तींचे पैसे त्यांना त्वरित परत मिळावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button