मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ३ जूनला शुभारंभ
५ जूनपासून नियमित फेऱ्या सुरु होणार

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणून राहिलेल्या मडगाव मुंबई सीएसएमटी वंदे भारतला अखेर तीन जून रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दि. 5 जून पासून ही सेमी हाई स्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे.
या संदर्भात खात्रीशीर माहितीनुसार दि. 3 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्यामुळे इनकी कधी सुरू होणार याबाबतची प्रतीक्षा संपली आहे.
ही गाडी दिनांक ५जून पासून प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी मिनिटांनी खेड येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी तर रत्नागिरीला ती सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल परतीच्या प्रवासात असताना ही गाडी रत्नागिरी येथून पाच वाजून 35 मिनिटांनी तर खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.



