महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. तोरल शिंदे यांचा कोल्हापूर येथे सन्मान
आयएसएआर संस्थेकडून मानाचा पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : महिलाच्या आरोग्यासाठी काम करत असताना कोकणातल्या ग्रामीण भागातील वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव झाल्यानंतर त्यासाठी विशेष शिक्षण घेऊन कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु करत अनेक कुटुंबाच्या घरी आनंद वाटणार्या डॉ. तोरल निलेश शिंदे यांचा कोल्हापूर येथे सन्मान करण्यात आला. Indian Society for Assisted Reproduction या संस्थेने मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
सन २०१४ मध्ये रत्नागिरीत कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु करून डॉ. तोरल शिंदे यांनी अनेक महिलांना अपत्य प्राप्तीसाठी एक आशेचा किरण दाखवला होता. सुमारे 9 वर्षांपूर्वी अपत्य प्राप्तीसाठी खर्चिक वाटणारी ही उपचार पद्धती कोकणातील रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वंतरी रुग्णालयात सुरु करताना इथल्या महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थितीचा प्रामुख्याने त्यांनी विचार केला. या उपचार पद्धतीबद्दल असणारे समाज गैरसमज दूर करण्यासाठी तब्बल दोन वर्षे दर महिन्याला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी मोफत तपासणी शिबिरे आयोजित करून महिलांच्या शंकांचे आणि भीतीचे निरसन केले. तर टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धतीतील इक्सी सारख्या प्रगत उपचार पद्धती सुद्धा रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून दिली. त्यांच्या अथक आणि सततच्या प्रत्यानांमुळे आजपर्यंत अनेक घरांमध्ये लहान बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. अनेक जोडपी अपत्य प्राप्तीमुळे आनंदी झाली आहेत.
डॉ. तोरल यांच्या याच कामाची दखल Indian Society for Assisted Reproduction या संस्थेने घेतली आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे झालेल्या मोठ्या सोहळ्यात ISAR पुरस्कार देवून सन्मान केला. या पुरस्कार सोहळ्याला ISAR च्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ जिरगे, डॉ रिनी ठाकर आणि यु के येथील डॉ सुलतान उपस्थित होते.