चिपळूणमध्ये नवदाम्पत्याची वाशिष्ठी नदीत उडी: NDRF आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरू

चिपळूण: धुळे जिल्ह्यातील नीलेश रामदास अहिरे (२६) आणि अश्विनी नीलेश अहिरे (१९) या नवविवाहित दाम्पत्याने मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशनजवळील गांधारेश्वर पुलावरून तुडुंब भरलेल्या वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेपूर्वी या दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते.
प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चिपळूण पोलीस बचाव पथकासह येथे तैनात असलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांचा शोध सुरू केला. सध्या वाशिष्ठी नदीला प्रचंड वेगवान प्रवाह असल्यामुळे सायंकाळ उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागलेला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेले हे दाम्पत्य सध्या चिपळूणमध्येच राहत होते. देवदर्शनासाठी दुचाकीवरून गांधारेश्वर येथे आले असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादामुळे आधी अश्विनीने नदीत उडी घेतली आणि पाठोपाठ निलेशनेही वाशिष्ठीच्या पात्रात उडी घेतली. या नवपरिणीत दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
स्थानिक पोलीस आणि NDRF कडून दोघांचाही शोध युद्धपातळीवर सुरू आहे.



