मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी वसई बसला अपघात

हातखंबा येथील घटना ; दोन महिला प्रवासी जखमी
रत्नागिरी : समाेरुन येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने रत्नागिरी वसई एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. हा अपघात आज, साेमवारी सकाळच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-महाड-वसई (एमएच १४, बीटी २४९८) ही गाडी साेमवारी सकाळी रत्नागिरीहून महाडकडे जाण्यासाठी निघाली हाेती. या गाडीमधून २१ प्रवासी प्रवास करत हाेते. गाडी महामार्गावरील हातखंबा येथे आली असता समाेरुन येणाऱ्या वाहनाने बसला हूल दिली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात कलंडली. या चरातच गाडी अडकून राहिल्याने सुदैवाने माेठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात दाेन महिला प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.



