रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांच्या गळ्यात सुरक्षेसाठी रेडियमचे पट्टे!
- मोकाट गुरांच्या शिंगांसह गळ्यात रेडियम लावले
- अपघातांची संख्या होणार कमी
संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठ आणि महामार्गावर शास्त्री, सोनवी, आंबेड या ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असतात. महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना धडक बसून अनेक जनावरे गंभीर जखमी होतात. वाहनचालकांना अचानक पुढे येणारे जनावरे दिसत नसल्याने अपघात होतात. मालकांकडून बिनधास्तपणे सोडल्या जाणाऱ्या जनावरांमुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे अपघात होत असल्याचे संगमेश्वर मधील काही जागृत ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जनावरांच्या शिंगाला रेडियम लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
संगमेश्वर बाजारपेठेतील भटक्या गुरांचे अपघात टाळण्यासाठी अमोल शेट्ये यांनी गुरांच्या शिंगाला रेडियम लावण्याचा विचार व्यक्त केला संगमेश्वर बाजारपेठेतील उद्योजक सिध्देश रमेश रहाटे यांनी ही पोस्ट वाचली आणि अशा प्रकारचे रेडिअम चे पट्टे कुठे मिळतात याची माहिती घेवून डायरेक्ट ॲमेझाॅन वर वीस पट्यांची ऑ र्डर दिली देखील दिली. पट्ट्यांची ऑर्डर डीलिव्हरी आल्यावर सदरचे रेडियम त्यांनी अमोलकडे आणून दिले आणि अजून कोणते सहकार्य लागणार असेल तर नि:संकोच सांगा मी मदतीला तयार आहे असे सांगितले.
रेडिअमचे पट्टे गो मातेच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी नितीन दिलीप शेट्ये गुरुनाथ खातू, विनायक खातु, मुकेश भगत, अर्जुन माने, गणेश प्रसादे, यांनी मदत केली म्हणून हे शक्य झाले. जनावरांच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक मोकाट फिरणारे जनावरे रस्त्याच्या बाजूला असलेले प्लास्टिक खातात त्यामुळे अनेक जनावरे दगावलेली सुध्दा आहेत.
मोकाट जनावरे सोडून देणारे मालक जनावरे गंभीर जखमी होऊ नये त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक वेळा महामार्गाच्या बाजूला जखमी जनावरे दिसून येतात. कोणतेही ठोस उपाययोजना होत नसल्याने मोकाट जनावरांचे हाल होत आहेत. मोकाट जनावरे सोडून बिनधास्तपणे वावरणाऱ्या मालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमेश्वरातील प्राणी मित्रांनी केली आहे.