वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील ट्रायल रन सुरू
दुपारी अडीच नंतर गोव्यातून पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार
रत्नागिरी : देशभरात जवळपास 14 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धाऊ लागलेली असताना देशातील पहिली तेजस एक्सप्रेस धावलेल्या कोकण रेल्वे मार्गावर ती नेमकी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतून चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसची ‘ट्रायल रन’ कोकण रेल्वे मार्गावर आज मंगळवारी सुरू झाली आहे. ट्रायल रन साठी मुंबईतील सीएसएमटी जंक्शन येथून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल देखील झाली आहे आहे. दरम्यान, चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सध्याची तेजस एक्सप्रेस बंद होते की, वेळापत्रक बदलून सुरूच ठेवले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, दुपारी अडीच वाजता चाचणीसाठी धावलेली वंदे भारत एक्सप्रेस गोव्यात मडगाव जंक्शनला पोहोचल्यानंतर तिथून तिचा परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री अकरा वाजता ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या कोकण रेल्वे मार्गावरील चाचणी दरम्यान रूट ट्रायल तसेच स्पीड ट्रायल या दोन प्रकारच्या चाचण्या होणे अपेक्षित आहेत. या चाचणीसाठी आजच्या प्रमाणेच अजूनही चाचणी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पासून वीर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेससाठी दुहेरी मार्ग असल्यामुळे वीर पर्यंत दोन्ही मार्गांवर रोड ट्रायल होईल, असे अपेक्षित आहे.