रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ५ वाजून ५३ मिनिटांनी सुटलेल्या हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबई ते गोवा ५८१ किलोमीटरचे अवघ्या सहा तास 57 मिनिटात पार केले. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची आज (मंगळवारी) ट्रायल घेण्यात आली. यामुळे पुढील काही दिवसात मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकुलीत आणि हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या ४ तास २७ मिनिटात तर पनवेल ते रत्नागिरी जवळपास तीन तासात कव्हर केले. दरम्यान दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून मुंबईसाठी रवाना झाली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव हे अंतर कापण्यासाठी सध्या तेजस एक्सप्रेसला ८ तास ५० मिनिटे, सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस ला १० तास ४१ मिनिटे, जनशताब्दी एक्सप्रेसला ९ तास तर मांडवी एक्सप्रेसला १२ तास लागतात. मंगळवारी याच अंतरात चाचणीसाठी धावलेल्या हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या ६ तास ५७ मिनिटांमध्ये पार केले.
कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस साठी मंगळवारी पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ट्रायल रन घेण्यात आली. या चाचणी दवडीसाठी रेल्वे बोर्डाच्या सूचनानुसार मुंबईतून गोव्याच्या दिशेने धडधडत जाणाऱ्या 16 डब्यांच्या वंदे भारत साठी कोकण रेल्वेची मेन लाईन खुली ठेवण्यात आली होती. वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे 590 किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास 57 मिनिटांमध्ये पार केले.