संगमेश्वरमधील भडकंबा गावाचा जलयुक्त शिवार-२ योजनेत समावेश
ग्रामस्थांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार 2 योजनेत संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावचा समावेश करणेत आला आहे.
या योजनेत संगमेश्वर तालुक्यातून फक्त 9 गावे समाविष्ट करण्यात आली असून या 9 गावांमध्ये भडकंबा गाव आहे. योजनेची पुर्वी कामे सुरू केली होती. परंतु काही कालावधी नंतर शासनाने ही योजना बंद केली. त्यामुळे गावातील अनेक कामे रखडली होती.
राज्यातील शिंदे सरकारने ही योजना परत जलयुक्त शिवार योजना 2 ही नव्याने पुन्हा सुरू केली आहे .या योजनेच्या माध्यमातून सिमेंट नाला बांध, समतल चर,दगडी बंधारे,शेततळी, गाळमुक्त नदी व गाळयुक्त शिवार यासह अनेक कामांचा समावेश करणेत आला आहे. नुकतीच संबंधित कृषी, जलसंधारण, पाटबंधारे पाणी पुरवठा,सामाजिक वनीकरण व वनविभाग या अधिकाऱ्यांनी गावामध्ये शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचे सर्वेक्षण केले. यासाठीचे सर्वेक्षण उपसरपंच प्रशांत बापू शिंदे व माजी सरपंच शेखर आकट यांनी गावातील शेती व शिवारात सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसह शेती शिवारात प्रत्यक्ष जाऊन केले. त्या अहवालानुसार भडकंबा गावाचा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.. त्यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे..



