कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्रराजकीय

संगमेश्वरमध्ये नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेने जागवल्या बालपणीच्या आठवणी!

  • पालकमंत्री उदय सामंत यांची स्पर्धेला उपस्थिती!


संगमेश्वर : पावसाळी हंगामात कोकणातील शेतीची पारंपरिक पद्धत जपणाऱ्या नांगरणी आणि भात लावणी स्पर्धांनी सध्या नव्या पिढीमध्ये उत्साह निर्माण केला आहे. नुकतीच, संगमेश्वर येथे बळीराजा वाढावेसराड पावस्कर वाडी आणि शिवसेना तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धेला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री, डॉ. उदय सामंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी कोकणातील मातीतल्या श्रमप्रतिष्ठेला आणि पारंपरिक पद्धतींना सलाम केला.


यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, “या अनोख्या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अशी स्पर्धा असली की मी शाळा चुकवायचो, पण ही स्पर्धा नाही चुकवायचो! आज तिथेच उभं राहून ते दिवस पुन्हा अनुभवले.” त्यांनी पुढे नमूद केले की, “संयम, चिकाटी आणि जिद्द यांच्या कसोटीवर उतरलेले स्पर्धक हेच आपल्या ग्रामीण भागाचे खरे हिरो आहेत. कोकणातील पारंपरिक शेती पद्धतींचा सन्मान जपत, या स्पर्धेमुळे एक सामाजिक एकात्मता आणि कृषी प्रेरणा देखील रुजते.”
याच व्यासपीठावरून बोलताना, पालकमंत्री सामंत यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत! हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आता जगभरात शिवरायांचा इतिहास अभ्यासला जाईल आणि त्यांच्या गडकिल्ल्यांना जागतिक गौरव प्राप्त होईल.”
या ऐतिहासिक घोषणेच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी संगमेश्वर परिसरातील विकासाविषयी माहिती दिली. “आपल्या संगमेश्वर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या स्मारकाच्या बांधकामाला अधिकृत सुरुवात होणार आहे,” अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
या स्पर्धेमुळे केवळ शेतीत रुची वाढत नाही, तर सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक सलोखाही जपला जात आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button