सारा ही देवकन्या आहे : महेंद्रशेठ घरत

- लाईट स्टाईलचे उद्घाटन सारा तेंडुलकर यांच्या हस्ते
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : “माझी आजी बालपणी मला काही तरी लहानसे सोन्याचे घ्यायची, तिच्या मुळेच मला लेटेस्ट दागिन्यांची आवड निर्माण झाली. त्यामुळे नवीन जनरेशनचा विचार करून पीएजीने तयार केलेल्या लेटेस्ट दागिन्यांची भुरळ नक्कीच तरुणाईला पडेल, त्यामुळे लाईट स्टाईलचे उद्घाटन करताना आनंद होत आहे, असे सारा तेंडुलकर खारघर येथे म्हणाल्या. त्यांच्या हस्ते दागिन्यांच्या शोरूमचे उद्घाटन झाले.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा युवा नेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले की “सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. क्रिकेट विश्वात अजरामर राहील,अशी कारकीर्द केली. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे देव आहेत. त्यामुळे सारा तेंडुलकर ही देवकन्या आहे.”
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी सारा तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा आपण नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आजोबा झाल्याचे महेंद्रशेठ घरत यांनी ‘गुड न्यूज’ सारा तेंडुलकर यांना दिली. त्यानंतर चक्क सारा तेंडुलकर यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या नातीसाठी नाजूक आणि आकर्षक दागिना पसंत केला. तो महेंद्रशेठ घरत यांनी ताबडतोब खरेदी केला.
यावेळी प्रीतम म्हात्रे म्हणाले, “सारा पनवेल नगरीत पहिल्यांदा आली आहे. पीएनजी ज्वेलर्स हा मराठी उद्योजकांचा ब्रॅण्ड आहे. आम्हाला यांचा सार्थ अभिमान आहे.”
यावेळी पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ म्हणाले, “येत्या दोन वर्षांत ५० ज्वेलर्स शॉप देशभर उघडले जातील. तरुण पिढीला सोबत घेऊन उत्तम सेवा आणि कालानुरूप डिझाईनद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जाईल. लाईटस्टाईल ही संकल्पना ग्राहकांना निश्चितच भुरळ पाडेल.”
यावेळी सारा तेंडुलकर, महेंद्रशेठ घरत, प्रीतम म्हात्रे यांचा यथोचित सन्मान पीएनजीचे सौरभ गाडगीळ यांनी केला.



