Konkan Railway | सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला शुक्रवारपासून वातानुकूलित दोन डबे जोडणार!

कोकणवासीय प्रवाशांना गारेगार प्रवासाची भेट
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव- -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबरपासून सामान्यांना परवडतील, असे इकॉनोमिक श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या संदर्भात ‘डीजी कोकण’चे वृत्ततंत्र खरे ठरले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडण्याची मागणी प्रवासी जनतेकडून केली जात होती. कोकण विकास समितीने यासाठी कोकण रेल्वेकडे पत्रव्यवहार देखील केला होता. रेल्वेने याची दखल घेत इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे दि. १५ सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डीजी कोकण’ने या संदर्भात काही दिवसापूर्वीच वृत्त दिले होते.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मडगाव सावंतवाडी (50108), त्याच रेकसह पुढे सावंतवाडी ते दिवा (10106) मार्गावर रोज चालवली जाणारी एक्सप्रेस गाडीला दिनांक 15 सप्टेंबर पासून दिनांक 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. यामुळे मागील अनेक वर्षांपासून पॅसेंजर तर सध्या एक्सप्रेस म्हणून चालवली जाणाऱ्या या गाडीतून पहिल्यांदाच ठंडा ठंडा कूल कूल असा प्रवास अनुभवता येणार आहे.
परतीच्या प्रवासात दिवा-सावंतवाडी (10105), सावंतवाडी ते मडगाव (50107) ही गाडी दिनांक 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वातानुकूलित थ्री टायर दोन डब्यांचा धावणार आहे.
सुधारित कोचरचना: दोन वातानुकूलित 3 टियर इकॉनॉमी क्लास, 10 सामान्य द्वितीय श्रेणी, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
आरक्षण : सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर 14.09.2023 पासून बुकिंग सुरू होईल.



