सिंधुरत्न कार्यकारी समितीच्या बैठकीत १३१ कोटींच्या योजनांना २७ कोटी वितरण करण्यास मंजुरी
- फळमाशी उच्चाटनासाठी आंबा बागायतदारांसाठी ट्रॅप : दीपक केसरकर
- हळद प्रक्रिया संशोधन उपकेंद्रास कृषी विद्यापीठाने प्रतिसाद द्यावा- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 4 (जिमाका) सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समितीच्या आज झालेल्या बैठकीत 131 कोटींच्या योजनांना 27 कोटी रुपये वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली. आंब्यावरील फळमाशीच्या उच्चाटनासाठी ट्रॅप देण्यास शालेय शिक्षणमंत्री तथा समितीचे अध्यक्ष दीपक केसरकरांनी मान्यता दिली. हिंगोली वसमत येथे मंजूर झालेल्या हळद प्रक्रीया संशोधन केंद्राचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करण्यासाठी कृषी विद्यापीठाने प्रतिसाद देण्याची सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. समितीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नाचणे, हळद या बाबतचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे. हौद्यांची वाहने देण्याबाबत योजना तयार करावी.
शेतकऱ्यांच्या मुलांना माजी सैनिकांकडून कृषी विद्यापीठाने प्रशिक्षण द्यावे. त्यांना ड्रेसकोड, कवायत या बरोबरच शेती विषयक कामकाजाचे प्रशिक्षण द्यावे. फणस लागवडीस प्राधान्य द्यावे. आंतरपीक झाले पाहिजे. या सर्व योजनांसाठी दिला जाणारा निधी संबंधित विभागाने 100 टक्के खर्च करावा.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, हौदा वाहन, छोटा हत्ती वाहन देण्याबाबत नवीन योजना बनवा.’त्यासाठीची योजना एम.आय.डीसी करत आहे. त्या बाबत विकास आयुक्तांशी चर्चा करावी. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांबाबत कार्यक्रम घेवून जागृती करावी, असेही ते म्हणाले.