सीडब्लूसी प्रशासन आणि बजेट टर्मिनलविरोधात कामगार करणार आमरण उपोषण
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यात स्थानिक, भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर रोजगाराच्या बाबतीत अन्याय सुरूच असून हे अन्याय थांबता थांबेना.त्यातच आता सीडब्लूसी पागोटे द्रोणागिरी येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उरण तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बदलत गेले तसे कामगांरावर प्रकल्पग्रस्तांवर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झाले. ३० वर्षापासून काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक कामगारांना डावलून ज्यांच्या या प्रकल्पाशी संबंध नाही आणि या वेयर हाउसमध्ये ज्यांनी या यापूर्वी कधी काम केलेले नाही अशा परप्रांतीय कामगारांना घेउन नोकरभरती करून सी. डब्लू.सी कंपनीतील गोडावून मध्ये प्रत्यक्ष लोडिंग अनलोडिंगचे काम सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केवळ स्वार्थापोटी सीडब्लूसी कंपनी प्रशासन व ठेकेदार हया गोष्टी करीत आहेत.त्यामुळे सुरवातीपासून काम करीत असलेल्या २५० स्थानिक कामगांरांना कामावर त्वरीत रुजू करून घ्यावे अन्यथा सीडब्लूसी वेअर हाउसच्या गेटवर दि २० नोव्हेंबर २०२३ पासून साखळी उपोषण व निदर्शने करण्यात येणार आहे. जर का या कालावधीत प्रश्न सुटला नाही तर दि २७ नोव्हेंबर २०२३ पासून कामगारांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आणि त्यानेही प्रश्न सुटला नाही तर दि २९ नोव्हेंबर २०२३ पासून कुटूबांसह कामगार प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी दिली.
स्थानिक, जुन्या कामगारांना नोकरीत डावलण्यात आल्याने तसेच स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांचे मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, विभागीय कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई, तहसीलदार उरण, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून स्थानिक कामगारांना नोकरीत सामावून घेण्याची विनंती केली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी शासनाच्या सर्व विभागांना, कामगार आयुक्तांना पत्रव्यवहार करून सुद्धा शासनाच्या संबंधित विभागातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामगारांच्या समस्येबद्दल कोणताही योग्य असा प्रतिसाद दिला नाही.आज पत्रव्यवहार करून एक महिना उलटला तरीही कामगारांची प्रशासनासोबत एकही मिटिंग झाली नाही. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही.त्यामुळे कामगार वर्गा मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कामगारांनी प्रशासनाला दिला आहे.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सेक्रेटरी संतोष ठाकूर, खजिनदार विश्वास घरत, उपाध्यक्ष किरण घरत, उपाध्यक्ष अशोक पाटील, सल्लागार दीपक ठाकूर, सदस्य- राजेंद्र ठाकूर,हनुमान पाटील, रमेश ठाकूर,शिवाजी म्हात्रे,भानुदास पाटील,जगदिश म्हात्रे,संतोष पाटील, जगदीश ठाकूर यांच्यासह कामगार,कर्मचारी त्यांचे कुटुंब आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत.