हनुमान, श्रुष्टी, बाळू, ओंकार ठरले दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धेचे विजेते
३५० स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली समर सायक्लोथॉन २०२३ उत्साहात संपन्न
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२३, सिझन ३ सायकल स्पर्धा रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील, वय ६ ते ७२ वयोगटातील ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली सालदुरे हर्णै आंजर्ले पाडले आडे उटंबर या समुद्र किनाऱ्यावरील मार्गावरुन कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली.
यामध्ये दापोली पाळंदे दापोली २० किमी मार्गावर अटीतटीची सायकल रेस स्पर्धा झाली. खुला गट सायकल स्पर्धा गटात हनुमान चोपडे पुणे, प्रणव कांबळे पुणे, सिद्धेश पाटील कोल्हापूर, हेमंत लोहार कोल्हापूर, हर्ष पवार पनवेल हे विजेते ठरले. त्यांना रुपये १११११, ७७७७, ५५५५, ३३३३, ११११, चषक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महिला गटात श्रुष्टी संजय कुंभोजे हातकणंगले कोल्हापूर, श्रावणी उमेश घोडेस्वार हातकणंगले कोल्हापूर, अदिती शिंदे पुणे, सिंगल गिअर गटात बाळू हिरेमठ इचलकरंजी, विलास वाघमारे अलीबाग रायगड, विनायक सूर्यवंशी पळूस सांगली आणि एमटीबी गटात ओंकार खेडेकर पुणे, हर्षद पाटील कोल्हापूर, संभाजी मोहिते नगर हे विजेते ठरले. तसेच प्रवीणकुमार कुलथे ठाणे वय ७२, गजानन भातडे रत्नागिरी वय ७२, रचना लागू ठाणे वय ६७, आर्यन अरुण लोहार पळूस सांगली वय १२, ग्रिष्मा सुदेशकुमार चव्हाण दापोली वय ११ यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर लकी ड्रॉ बक्षिसातील सायकल साईप्रसाद उत्पल वराडकर याने जिंकली.
सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी नीलिमा अशोक देशमुख, दापोली पोलीस निरीक्षक विवेक आयरे, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर जाधव, श्री सायकल मार्टचे मंदार बाळ, आंजर्ले सरपंच मंगेश महाडिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. मार्गावर ठिकठिकाणी सायकल स्पर्धकांचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, सर्वेश बागकर, अजय मोरे, साजिद कागदी, राजेंद्र नाचरे, विद्याधर ताम्हणकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली