पेट्रोलसाठी झाल्या आता सीएनजीसाठी रांगा
रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी वाढल्याने सीएनजी पंपांपुढे वाहनांच्या रांगा

रत्नागिरी : डिझेल पेट्रोलच्या मर्यादित साठा म्हणून आणि वाढत्या वाहनांच्या तुलनेत पुरवठ्यात व्यत्यय येऊ लागल्याने सीएनजीकडे मोठ्या आशेने पाहिले जात होते. अनेक वाहनधारक सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांकडे वळले देखील. मात्र पेट्रोलपाठोपाठ आता सीएनजीसाठी देखील तासन तास रांगा लावाव्या लागत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. रत्नागिरीत मागील काही दिवसांपासून पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे सीएनजी पंपांच्या समोर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
चार वर्षांपूर्वीच रत्नागिरीत सीएनजी स्टेशन सुरु करण्यात आले. पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लावाव्या लागत असल्यामुळे अनेक वाहनधारक पर्यावरणपूरक सीएनजीकडे वाळले. अनेकांनी सी एन जी वर आधारित वाहने खरेदी केली. मात्र, अवघ्या काही वर्षातच मागणीपेक्षा पुरवठा कमी पडू लागल्यामुळे पेट्रोल प्रमाणे सीएनजी पंपावर देखील वाहनांची गर्दी होऊ लागली आहे.
एप्रिल मे महिन्यात रत्नागिरीत पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या इतर भागात असलेल्या सीएनजी पंपामध्ये वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे सीएनजी स्टेशनपुढे वाहनांची गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.



