चला अनुभवू या काजव्यांची अद्भुत दुनिया!
सोबत रातकिड्यांचे संगीत ; १७ जून रोजी आयोजन

संगमेश्वर : नवीन पिढीला निसर्गाची ओळख व्हावी, ऋतू बदलत असताना निसर्गाकडून कोणकोणते संकेत मिळतात याची अनुभूती व्हावी या उद्देशाने देवरुख येथील निसर्गप्रेमी युयुत्सु आर्ते यांनी दि. १७ जून रोजी ‘काजवे पर्यटन’ आयोजित केले असून संगमेश्वर तालुक्यातील निसर्गप्रेमीनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
अमावास्येला काळाकुट्ट अंधार असतो . या अंधारात लाखो काजव्यांच्या सोनेरी प्रकाशाची उघडझाप पहायला मिळणे म्हणजे एक अद्भुत नजाराच. देवरुख येथील पार्वती पॅलेस हॉटेल जवळून १७ जून रोजी सायंकाळी ६ वा. स्वतःचे वाहन घेऊन काजवे पर्यटनसाठी निघायचे आहे. देवरुख पासून केवळ ५० मिनीटांचे अंतरावर सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पोहचायचे आहे.
सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी सोबत, बॅटरी, पायात बूट, हातात काठी , पुरेसे खाणे आणि पाणी घेऊन यायचे आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० हा काजवे पर्यटनाचा कालावधी असून रात्री ११ वा . देवरुख येथे परत यायचे आहे. या पर्यटना दरम्यान सह्याद्रीतील ४० फूट घेराचच्या वृक्षासाह १०० फूट उंचीचा अजस्त्र वृक्ष दाखवला जाणार आहे. या काजवे पर्यटनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सहभागी होणाऱ्यांनी युयुत्सू आर्ते ९४२२३५१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटनाची नवी संधी
लाखो काजव्यांचे झाडावर लकाकणे सुरु असते. याच्या जोडीला रातकिड्यांची किरकिर म्हणजे जणू एकप्रकारचे संगीतच असते. अमावस्येच्या गडद अंधारात या सोनेरी प्रकाशाचे मनोहारी दर्शन घेण्याची संधी काजवे पर्यटनाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यात प्रथमच उपलब्ध करुन दिली जात आहे. ज्या प्रमाणे कृषी पर्यटन असते , फुले फुलल्यानंतर कास पठारावर निसर्गप्रेमींचे पर्यटन सुरु होते त्याच धर्तीवर कोकणात काजवे पर्यटन सुरु करुन नवीन पिढीला ऋतू बदलाचे संकेत दाखवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
हे देखील वाचा???
कोकण रेल्वे मार्गावर नवीकोरी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ उद्घाटनासाठी दाखल!



