कोकणमहाराष्ट्रसाहित्य-कला

गोवेकर कवींच्या शब्दसुमनांनी लांजावासीय चिंब झाले!

लांज्यात गोमंतकीय कवींचा ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

लांजा (टीम डिजिकोकण) :
मुचकुंदीच्या भेटी मांडवी आलीसे।
काळीज उसासे घेवोनीया।।

असा आजचा कार्यक्रम आहे. लांजा असो वा गोवा, मानवी जीवन भावजीवन सर्वत्र तेच आहे. फरक असेल तर तो थोडाफार तपशिलाचा. गोमांतकीय भूमीच्या प्राकृतिक सौंदर्याइतकाच इथल्या लोकवाड:मयीन संस्कृतीचा गंध व कवितेची अमीट गोडी ही रसाळ, गोमटी असून गंध मातीचा छंद कवितेचा या गोमंतकीय लोकवाड्मयीन संस्कृती व कवितेचे मनोज्ञ दर्शन घडविणा-या कार्यक्रमातून मुचकुंदीच्या भेटीला साक्षात मांडवी भेटायला आली, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा लांजाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.

लांजा शहरातील माऊली सभागृहात शनिवार दि.१५ जुलै रोजी सायंकाळी गोमंतकीय लोकवाड्मय व कवितेचे मनोज्ञ दर्शन घडविणा-या ” गंध मातीचा… छंद कवितेचा” या गोव्यातील नामवंत कवींचा कार्यक्रम आस्थावान साहित्यरसिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई क्षीरसागर, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, कार्यवाह विजय खवळे, लोकमान्य वाचनालय लांजाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई शाखा लांजाचे अध्यक्ष किरण बेर्डे अादि मान्यवर उपस्थित होते.

ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितेचे पीठ पडत होते. जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्यातील रसिक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करावेसे वाटते अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी खास रत्नागिरीहून आलेले कोकण मीडियाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी दिली.

गोव्याच्या भूमीत इंग्रजी व कोकणी भाषेचे प्रभुत्व असतानाही माय मराठीची सेवा करतानाच तिची थोरवी गाण्यासाठी आयोजिलेल्या ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ या कार्यक्रमातून गोमंतकीय भूमीतील लोकसाहित्याच्या प्रसिद्ध अभ्यासिका पौर्णिमा केरकर, गझलकार प्रकाश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या कवियित्रि चित्रा क्षीरसागर, गोव्यातील साहित्य विश्र्वात आपल्या साहित्यकृतींनी मुद्रा उमटविणा-या दीपा मिरिंगकर, आसावरी कुलकर्णी, शुभदा च्यारी, रजनी रायकर व विठ्ठल शेळके या प्रामुख्याने मराठी भाषेत लेखन करणा-या साहित्यिकांनी एकापेक्षा एक सरस व सकस कवितांचे वाचन करित गोमंतकभूमीतील लोकजीवन, स्त्रीजीवन, निसर्ग व संस्कृती यांचे सप्तरंगी कोलाज उलगडून दाखविले. त्याला लांज्यातील संस्कृतीप्रेमी साहित्यरसिकांनीही तितकीच मनमुराद दाद दिली.

काव्यवाचनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात चित्रा क्षीररसागर यांनी सादर केलेली स्वत:च्या आतल्या झ-याचा शोध घेताहेत पोरी ही कविता एकविसाव्या शतकातील नव्या आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा प्रत्यय करुन देणारी ठरली. लोकवाड्मयाच्या अभ्यासिका पौर्णिमा केरकर यांनी सादर केलेल्या ‘बापांनी पुरयिले’ या कवितेतून बाप-मुलीच्या नात्यातील ह्दयस्पर्शी नातेसंबधांवर भाष्य केले.’असे असावे जीवन माझे आयुष्यात एकदा फुलावे’ ही सात वर्षातून एकदा कोकणातील कातळसड्यांवर उगविणा-या कारवी या वनस्पतीचे जीवनगाणे गाणारी आसावरी कुलकर्णींची कविता, आज भूमी श्रावणाने धुंद झाली कोंब येता पावसाने धुंद झाली ही प्रकाश क्षीरसागरांची कविता यांना रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.रजनी रायकर यांनी बाप मायेचा झरा तर दीपा मिरिंगकर यांनी ‘तू आषाढीला जा मि कार्तिकीला जाईन’ या कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विठ्ठल शेळके व शुभदा च्यारी या द्वयीच्या आशयघन व ओघवत्या निवेदनाने उपस्थित श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला.

श्रावणधारा बरसण्याच्या सुरवातीलाच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा सारख्या छोटेखानी शहरात गोमंतकीय भूमीतील मराठी व कोंकणी भाषेत लेखन करणारे तब्बल आठ कवी एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापच्या विजयालक्ष्मी देवगोजी, विजय हटकर, महेंद्र साळवी, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. अभिजित जेधे, योगेश वाघधरे, उमेश केसरकर, रामचंद्र लांजेकर यांनी विशेष मेहनत घेतली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यानी तर आभार उमेश केसरकर यांनी मानले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button