मायक्रोस्कॅन प्रीमियर लीगमध्ये बी. सी. ए. भेंडखळ संघाने पटकावले विजेतेपद
- अंतिम सामन्यात नाईक क्रिकेट अकादमीवर 6 गडी राखून केली मात
- जिज्ञेश म्हात्रेची अष्टपैलू खेळी, भाविक पाटीलचे अर्धशतक
उरण दि 14 (विठ्ठल ममताबादे ) : मास्टर क्रिकेट असोसिएशन, लोणावळा आयोजित मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग ही 14 वर्षाखालील 45 षटकांची लेदर क्रिकेट स्पर्धा लोणावळा (पुणे) येथे पार पडली. मंगळवारी (12 डिसेंबर) रोजी झालेल्या नाईक अकादमी तळेगाव (पुणे) विरुद्ध बीसीए भेंडखळ (उरण तालुका -रायगड ) संघात अंतिम लढत झाली. या सामन्यात बीसीए भेंडखळ (रायगड) संघाच्या जिज्ञेश म्हात्रेने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नाईक क्रिकेट अकादमी तळेगाव या तगड्या संघावर 6 गडी राखून मात केली आणि विजयी चषकावर आपल्या संघाचे नाव कोरले.
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे स्पर्धेत सुरुवातीपासून चुरस पाहायला मिळाली. अंतिम सामन्यात नाईक अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बीसीए संघाकडून कर्णधार प्राणिकेत पाटील, विस्मय बल्लाळ, अर्णव पाटील, आरुष ठाकूर यांचा वेगवान मारा तर जिज्ञेश म्हात्रे, वेद कडूच्या फिरकी माऱ्यासमोर नाईक एकादमीचा डाव 41.1षटकांत 180 धावांवर आटोपला.
सलामीला आलेल्या आशुतोष भेगडेने 25 तर आधीच्या सामन्यात द्विशतक ठोकलेल्या साई बोऱ्हाडेने 27 धावा केल्या. याशिवाय कर्णधार जय अग्रवाल (21), आरोही रावत (20), आर्य पाटील (30) यांनीही उपयुक्त खेळ्या केल्या. बीसीए संघाकडून जिज्ञेश म्हात्रे आणि वेद कडूने प्रत्येकी 3 तर अर्णव पाटील, विस्मय बल्लाळ, आरुष ठाकूरने एकेक बळी टिपला. 181 धावांचा पाठलाग करताना बीसीए संघाचे सलामीवीर अर्णव पाटील आणि दर्शील ठाकूर हे दोघेही बाद झाल्यावर डावाची सूत्रे जिज्ञेश म्हात्रे याने घेतली.