कोकण रेल्वेची नवीन मेमू ट्रेन पाहिलीत?
रोहा स्थानकावर पाहायला मिळाली पहिली झलक!
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर सध्या धावत असलेल्या पॅसेंजर गाडीला मेमू ट्रेनमध्ये बदलण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. आयसीएफ चेन्नई येथील कारखान्यातून कोकण रेल्वेकरिता तयार करण्यात आलेल्या मेमू गाडीची झलक रोहा स्थानकावर नुकतीच पाहायला मिळाली
या संदर्भात आधी मिळालेल्या माहितीनुसार सध्या दिवा ते रत्नागिरी या मार्गावर धावणाऱ्या एल एच बी श्रेणीतील पॅसेंजर गाडीची जागा ही नवी मेमू ट्रेन घेणार आहे. त्यासाठीचे नवे-कोरे मेमूचे रेक मार्गावर धावण्यासाठी दाखल देखील झाले आहेत. मात्र, ही गाडी दिवा-रत्नागिरी मार्गावरच धावते की, कोकणवासीयांच्या मागील काही वर्षांपासूनच्या मागणीनुसार मुंबईतील पश्चिम उपनगरातून (वसई रोडमार्गे ) कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाते याचा अंतिम निर्णय रेल्वेने अजून जाहीर केलेले नाही.
रेल्वेच्या कारखान्यातून कोकण रेल्वेसाठी बनवून आलेल्या आणि मार्गावर प्रत्यक्ष धावण्यासाठी सज्ज झालेली मेमू गाडी कोकण रेल्वे मार्गावर कधी धावते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
नवीन मेमू गाडी मार्गावर प्रत्यक्ष धावण्यापूर्वी सर्वसाधारणपणे गाडीची चाचणी घेतली जाते. यानुसार दोनच दिवसांपूर्वी या किंवा अशाच कारणासाठी कोकण रेल्वेची नवी कोरी मेमू ट्रेन रोहा स्थानकावर उभी असलेली पाहायला मिळाली. त्याआधी ही गाडी मडगाव येथे असल्याचे रेलप्रेमींकडून सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेची ही नवी मेमू ट्रेन मार्गावर प्रत्यक्षधावेल, अशी शक्यता आहे.