फाटक हायस्कूलच्या शारदोत्सवात ‘आरोग्याचा जागर’

रत्नागिरी : रत्नागिरी येथील फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारदोत्सवाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुमिता भावे यांच्या हस्ते शारदादेवीचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे राजीव गोगटे, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेत गेल्या वर्षापासून शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पारंपरिक उत्सवाला सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची जोड देत हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. गतवर्षी ‘जागर स्त्रीशक्तीचा’ ही संकल्पना राबविण्यात आली होती. यंदा ‘जागर आरोग्याचा’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
या संकल्पनेअंतर्गत नऊ दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्याच्या विविध विषयांवरील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच प्रात्यक्षिकांचा समावेश असणार आहे.
या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि आरोग्याबाबत योग्य सवयी विकसित करणे हा उद्देश आहे.
घटस्थापनेच्या दिवशी शारदादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी देवीचे पूजन करून उत्सवाचा प्रारंभ केला. ज्ञानाराधनेसोबतच आरोग्यजागृतीचा संदेश देणारा यंदाचा शारदोत्सव विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे..



