कोकणमहाराष्ट्र

जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आदेश


रत्नागिरी : आगामी काळातील विविध सण-उत्सव, स्थानिक आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मान्यतेने अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये हे आदेश लागू केले असून, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील.
येत्या काळात ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या रोजी नवरात्रौत्सव, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमा यांसारखे सण-उत्सव साजरे होणार आहेत. तसेच खेड येथील कोकोकोला कंपनी, अलोरे-शिरगाव येथील सायफिस्ट कंपनी, वाटदखंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये हिंदू मुस्लीम बौध्द तसेय इतर धर्मियांची मिश्रवस्ती असल्याने काही वैयक्तिक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दयावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून याच अनुषंगाने होणा-या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी डाव्या/विद्यार्थी संघटना या स्थानिक पातळीवर आंदोलनात्मक भुमिका घेवून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालय सह इतर प्रशासकीय कार्यालये, शहर/गाव पातळीवर प्रमुख ठिकाणी आंदोलने करु शकतात. ज्यामध्ये मोर्चा, कॅन्डल मार्च, रस्ता रोको अशी आंदोलन केली जावू शकतात. सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरुन दोन समाजांमध्ये तेड निर्माण झालेले असून त्यावरुन आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
आदेशानुसार खालील बाबींवर बंदी राहील:

  • शारीरिक दुखापत पोहोचवण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा कोणतीही वस्तू सोबत बाळगणे.
  • कोणताही दाहक अथवा स्फोटक पदार्थ सोबत घेऊन फिरणे.
  • दगड, इतर शस्त्रे किंवा फेकावयाची साधने जमा करणे अथवा तयार करणे.
  • शांतता धोक्यात आणणारी किंवा सभ्यता व नीतीविरुद्ध भाषणे करणे, सोंग आणणे आणि अशा वस्तूंचा प्रसार करणे.
  • व्यक्ती, प्रेते अथवा आकृत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे.
  • शांतता भंग होईल अशा सार्वजनिक घोषणा देणे, गाणी गाणे अथवा वाद्य वाजवणे.
  • सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे.
    परवानगी व सूट:
    या कालावधीत कोणताही मोर्चा, मिरवणूक अथवा सभा आयोजित करावयाची असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहील.
    अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी आणि सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे व नाट्यगृहे यांना या प्रतिबंधात्मक आदेशातून सूट देण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button