दापोलीचे अभिजीत मयेकर यांची हिमाचल प्रदेश सोलो सायकल मोहीम सुखरुप पूर्ण

मनाली (हिमाचल प्रदेश ): धरमशाला पालमपूर मनाली खोऱ्यातील दुर्गम रस्ते, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, निसर्गसौंदर्य याचे वेड जगभरातील पर्यटकांना खूपच आहे. दापोली सायकलिंग क्लबचे दापोलीतील असोंड गावाचे अभिजीत मयेकर यांनी ४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हिमाचल प्रदेशातील पठाणकोट, धरमशाला, मंडी, मनाली अशी ४००+ किमीची सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही त्यांची एकट्याने केलेली सेल्फ सपोर्टेड म्हणजेच आपले सामान स्वतःच्या सायकलवर घेऊन केलेली सायकल मोहीम होती.
क्लीन भारत, ग्रीन भारत, राईड क्लीन, ब्रिद क्लीन हा संदेश घेऊन कोकणातील हा सायकलस्वार हिमालयाचे कठीण घाट यशस्वीपणे पार करुन आला.
या सायकल मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना अभिजित मयेकर यांनी सांगितले की पठाणकोट येथून ही सायकल मोहीम सुरु झाली. त्यासाठी स्वतःची सायकल दापोलीहून खेड मुंबई मार्गे ट्रेनमधून नेण्यात आली. हिमाचल प्रदेशातील या सायकल मोहिमेत ऐतिहासिक नूरपूर किल्ला, मार्गावरील स्थापत्यकला, सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे, महालांचे अवशेष, भाली गाव, शहापूर, मस्तपूर, हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर वसलेले आणि टेलिव्हिजनवर नेहमी भुरळ पाडणारं धरमशाळा क्रिकेट स्टेडियम प्रत्यक्षात डोळ्यांसमोर पाहतानाचा आलेला थरार, गोपाळपूरचे चहा गार्डन, पालमपूर मधून दिसणाऱ्या धौलाधार पर्वतरांगांच्या बर्फाच्छादित शिखरांचे विलोभनीय रुप, बैजनाथ शिवमंदिर, बीर बिलिंग पॅराग्लायडिंग लँडिंग पॉईंट, आकाशात रंगीबेरंगी पक्ष्यांप्रमाणे झेपावणाऱ्या पॅराग्लायडर्सना उतरताना पाहण्याचा मनसोक्त आनंद, जोगिंदर नगरमधील युनेस्को लिस्टेड ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आणि टॉय ट्रेन, ऐतिहासिक ब्रिटिशकालीन शानन पॉवर हाऊस, कस काढणारा जोहार घाटीतील झटिंगरीचा पल्ला, इथून दिसणारे माऊंटन व्ह्यू, ३६० अंशात पसरलेले धवलाधार डोंगर, डोंगराच्या उतारावर वसलेली फुट्टाखल सारखी छोटी खेडी आणि जुनी लाकडी हिमालयीन घरे, हिमालयातील आयुष्यात कधीही न पाहिलेला अत्यंत विलोभनीय सूर्यास्त, मंडी शहर, बियास नदीच्या सोबतीने संथ चढणीचा टप्पा, पंडोह धरण, हनोगी माता मंदिर, पांगन गाव, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सफरचंद, प्लम, नाशपाती, जरदाळू आणि डाळिंबाच्या बागा, पतलीकुहल, मनाली अशी वेगवेगळी ठिकाणे गोष्टी जवळून पाहिल्या, अनुभवल्या.
निसर्गाचे बदलते रंग, रस्त्याचे चढउतार, थंडी वारा पावसाने घेतलेली परीक्षा, हिमालयातील लोकांचा निखळ आणि प्रेमळ पाहुणचार त्यामुळे हा थकवणारा पण मनाला प्रचंड समाधान देणारा सायकल प्रवास झाला. हिमालयाच्या वाटा खूप काही शिकवून जातात. कोकणच्या किनारपट्टीवरुन थेट हिमालयाच्या दुर्गम घाटात ४००+ किमी अंतर आणि हजारो मीटर्सचे कडक एलिव्हेशन पार करतानाचे अनेक थरारक अनुभव पाठीशी जमा झाले. सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने ही स्वप्नवत सोलो मोहीम प्रत्यक्ष जमिनीवर उतरली. ही थरारक सायकल मोहीम पूर्ण केल्याबद्दल अभिजीत मयेकर यांचे कौतुक होत आहे.



