कोकणदेश-विदेश

राष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिरनेरच्या ‘कर्जाची छाया’ची दमदार धडक!

  • दोनशेहून अधिक लघुचित्रपटांमधून निवड; चिरनेरचे सुपुत्र पृथ्वीराज कडू यांच्या दिग्दर्शनाला राष्ट्रीय स्तरावर दाद

उरण  (विठ्ठल ममताबादे) : कलाकारांची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यातील चिरनेर गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चिरनेरचे सुपुत्र पृथ्वीराज कडू यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि पृथ्वीराज कडू फिल्म्स निर्मित ‘कर्जाची छाया’ या लघुचित्रपटाची अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना आयोजित ‘शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६’ अंतर्गत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लघुचित्रपट स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या २०० हून अधिक लघुचित्रपटांमधून या चित्रपटाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याने चिरनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विशेष म्हणजे, अत्यंत कमी कालावधीत या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाचे लेखन अवघ्या एका दिवसात करण्यात आले, तर दोन दिवसांत चित्रीकरण आणि पुढील दोन दिवसांत संकलनाचे काम पूर्ण करण्यात आले. कमी वेळेत उत्कृष्ट नियोजन, सांघिक मेहनत आणि कलात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर या चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले आहे.

या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन पृथ्वीराज कडू यांनी केले असून, लेखन सुभाष कडू यांनी केले आहे. चित्रीकरणासाठी कॅमेरा सोनिकचे प्रोप्रायटर सोनिक ठाकूर आणि सिनेमॅटिक सचिनचे प्रोप्रायटर सचिन म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या तांत्रिक सहकार्यामुळे चित्रपटाला दर्जेदार स्वरूप प्राप्त झाले आहे.

या चित्रपटात सुशील म्हात्रे, अक्षर कडू, सिद्धेश मोकल, ऋषिकेश कडू, सुभाष कडू, सुगंधा कडू आणि पृथ्वीराज कडू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

तसेच निर्मिती व तांत्रिक सहकार्यात सोनिक ठाकूर, सचिन म्हात्रे, पृथ्वीराज कडू, केवल मोकल, यश गाताडे , राज तांडेल , आदित्य म्हात्रे, करण कोंडिलकर, यश माळी आणि आर्यन पाटील यांचे योगदान लाभले आहे.

या स्पर्धेची घोषणा २ ऑगस्ट रोजी आमदार बच्चू कडू आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.  या स्पर्धेचे प्रमुख संदीप मोहिते-पाटील आहेत.

या महोत्सवाचा अंतिम निकाल जानेवारी २०२७ मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर होणार आहे.

उरण तालुक्यातील चिरनेरसारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. ‘कर्जाची छाया’ या लघुचित्रपटाला अंतिम फेरीत यश मिळावे आणि चिरनेरच्या कलाकारांचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल व्हावा, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button