रत्नागिरी तालुकास्तरीय गड-किल्ले स्पर्धेत नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळ अव्वल; जय हो ग्रुप द्वितीय

- मुरुड जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक; राजगड आणि सिंहगडाच्या प्रतिकृतींनाही पारितोषिक
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आ. श्री. नीलेश राणे मित्रमंडळ, खा. श्री. नारायणराव राणे संपर्क कार्यालय आणि प्रहार Digital यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुकास्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत बागवाडी, कोळंबे येथील नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळाने मुरुड जंजिरा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकावला.


द्वितीय क्रमांक झरेवाडी येथील जय हो ग्रुपने साकारलेल्या राजगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला मिळाला. तर तृतीय क्रमांक खालची आळी येथील ओंकारविश्व अपार्टमेंटमधील श्रावणी व वरद प्रवीण झगडे, अनुजा शिंदे आणि आराध्य आंबेकर यांनी साकारलेल्या सिंहगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला मिळाला.

या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठीही दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये बेहरेवाडी, कुर्धे-मेर्वी येथील सानिया बाणे, श्लोक बाणे आणि आदित्य बाणे यांनी साकारलेल्या लोहगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला, तर घुडेवठार येथील करण प्रथमेश घुडे यांनी साकारलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार २२२ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार १११ रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून मागविण्यात आले होते. परीक्षकांनी निवडलेल्या दहा रील्समधील किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन अंतिम तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. सहभागी सर्व स्पर्धकांच्या रील्सना प्रहार Digital च्या इन्स्टाग्राम पेजवर प्रसिद्धी देण्यात आली.
गड-किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि दुर्गसंवर्धनाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



