सरकारी शिक्षकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होणार नाहीत : शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा
मुंबई (सुरेश सप्रे) : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा मोठा आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी तसेच तो मोडून काढण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी शाळांतील शिक्षकांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या यापुढे होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसांत याबाबतचा आदेश काढण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडित काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या यापुढे होणार नाहीत.
शिक्षकांच्या विनंतीनुसार अथवा त्यांच्यावर तक्रारी आल्यास तत्काळ बदली केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. तसेच शिक्षक भरतीसाठी यापूर्वी परीक्षा घेतलेल्या उमेदवारांच्या लवकरात लवकरच नेमणुका दिल्या जातील.
संच मान्यतेनंतर नेमणुका देण्यात येतील, असेही नाम. केसरकर यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे शिक्षकवर्गासह दलालांमध्ये खळबळ उडाली असून शिक्षक संघटना यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.