युवा महोत्सवात देवरुख महाविद्यालयाला दोन पदके

एका सुवर्णपदकासह रौप्य पदकाचाही समावेश
देवरुख : मुंबई विद्यापीठाच्या ५६व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही दोन पदके महाविद्यालयाला फाईन आर्ट या कला प्रकारांमध्ये प्राप्त झाली आहेत.
फाईन आर्ट मधील पोस्टर मेकिंग या कला प्रकारात अक्षय शिवाजी वहाळकर याने ‘मोबाईलचा अतिवापर’ या विषयावर आपली कला सादर करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. अक्षय वहाळकर याने गतवर्षी मुंबई विद्यापीठ संघातून सहभागी होऊन भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत पोस्टर मेकिंग व रांगोळी या कलाप्रकारात पदक प्राप्त करून चमकदार कामगिरी केली होती. तर सुयोग चंद्रकांत रहाटे याने क्ले मॉडेलिंग (मातीकाम) या कला प्रकारात ‘संघर्ष’ या विषयावर आपली कला सादर करून रौप्य पदकाला आपलेसे केले. याच स्पर्धेत सुयोग रहाटे याने कार्टूनिंग (व्यंगचित्र) कला प्रकारात या अगोदर सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
अक्षय वहाळकर आणि सुयोग रहाटे यांना कला शिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे आणि प्रा. धनंजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. अक्षय व सुयोग यांनी मिळवलेल्या याबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. विकास शृगारे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.



