Konkan Railway | नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या फेऱ्या जून अखेरपर्यंत वाढवल्या
रत्नागिरी : नागपूर ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून विदर्भातून थेट कोकणात येणारी ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. या गाडीची मागणी आणि या गाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून नजीकच्या काळात ही गाडी कायमस्वरूपी म्हणून धावू शकेल अशी स्थिती आहे.
नागपूर ते मडगाव ही विशेष गाडी (01139/01140) कोकण रेल्वे मार्गे चालवली जात आहे. या गाडीच्या आधी जाहीर केलेल्या 31 मार्चपर्यंत चालणार होत्या. मात्र आता या गाडीच्या फेऱ्यांचा विस्तार करून ती जून 2024च्या अखेरपर्यंत राहणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार नागपूर ते मडगाव या मार्गावर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस ही गाडी (01139) धावते तर मडगाव जंक्शन ते नागपूर या प्रवासासाठी ही विशेष गाडी (01140) आठवड्यातील दर गुरुवार आणि रविवारी प्रवासाला निघते.
ही गाडी वार्धा जं., पुलगांव, धामांगांव, बडनेरा जं., अकोला, शेगांव, माळकापूर, भुसावळ जं., नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मंगणौ, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कांकावली, कुडाळ, थिवीम आणि करमळी स्थानकावर थांबते.
ही विशेष गाडी एकूण 24 डब्यांची आहे. त्यात 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 05 कोच, स्लीपर – 11 कोच, सेकंड सीटिंग – 05 कोच, एसएलआर – 02 अशी या गाडीची रचना आहे.