गोवा वंदे भारत, तेजस एक्सप्रेससह एलटीटी-मडगाव एक्सप्रेसचे १० जूनपासूनचे आरक्षण अखेर सुरू
डीजी कोकण’च्या वृत्ताची रेल्वेकडून तातडीने दखल ; तिन्ही गाड्यांचे आरक्षण सुरु

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेस सह एलटीटी मडगाव या तीन एक्सप्रेसचे मान्सून कालावधीतील आरक्षण अखेर आजपासून सुरू झाले आहे. रेल्वेच्या 120 दिवस आगाऊ आरक्षणाच्या नियमानुसार इतर गाड्यांचे आगाऊ आरक्षण सुरू झालेले असताना या तीनच गाड्यांचे आरक्षण सुरू झाले नसल्याने ‘डीजी कोकण’ने याकडे लक्ष वेधले होते. कोकण रेल्वेची तत्काळ दाखल घेत शुक्रवारपासून हे आरक्षण सुरू देखील झाले आहे.
- डीजी कोकणचे २४ एप्रिलचे संबंधित वृत्त : Konkan Railway | रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत पावसाळ्यात गोवा वंदे भारतसह तेजस एक्सप्रेस रद्द?
कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी पावसाळ्यासाठीचे स्वतंत्र वेळापत्रक आखले जाते. या कारणाने कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस तसेच एलटीटी मडगाव यापूर्वीच्या डबल डेकर गाडीच्या वेळेवर चालवण्यात येणाऱ्या एक्सप्रेस गाडीच्या फ्रिक्वेन्सीवर परिणाम होत होता. म्हणजेच या गाड्यांचे धावण्याचे दिवस पावसाळी वेळापत्रकानुसार कमी केले जातात.
रेल्वेच्या आरक्षणाच्या नियमानुसार 120 दिवस आधी आरक्षण सुरू होते. मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वरील तीन गाड्या सोडून उर्वरित सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू झाले होते. याकडे ‘डीजी कोकण’ने रेल्वेचे लक्ष वेधले होते. मध्य तसेच कोकण रेल्वेने याची तत्काळ दखल घेत शुक्रवारपासून आपल्या आरक्षण प्रणालीत या तिन्ही गाड्या 10 जून 2024 पासून पुढे देखील आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.



