
रत्नागिरी : रेल्वे गाड्यांमधील गर्दीचा फायदा घेऊन कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढत असतानाच आता प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. उन्हाळी व सुट्टीच्या हंगामामुळे या मार्गावरील अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती असताना दुसरीकडे रेल्वे गाडीच्या अख्ख्या डब्यात प्रवाशांना सहप्रवाशांची सोबत नाही, असे उदाहरण काल दि. १८ मे रोजी पुण्याहून रत्नागिरीसाठी सुटलेल्या समर स्पेशल ट्रेनमध्ये पाहायला मिळाले. या घटनेमुळे रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 18 मे रोजी पुणे येथून रत्नागिरी साठी 01131 या क्रमांकाची अनारक्षित ट्रेन निघाली होती. या गाडीच्या बॅक एन्डकडून तिसऱ्या क्रमांकाच्या कोचमध्ये केवळ तीन ते चारच प्रवासी होते. संपूर्ण डब्यात तीन महिला व एक पुरुष प्रवास करीत होते. सोबतीला अन्य कोणीही प्रवासी नसल्यामुळे हा प्रवास या तिन्ही महिला प्रवाशांसाठी अत्यंत भीतीदायक बनला होता. त्यातच त्यांच्या डब्यातून करणार प्रवास करणाऱ्या एक व्यक्ती या महिलांकडे सतत बघत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांमध्ये अधिकच असुरक्षेची भावना भावना निर्माण झाली.
या परिस्थितीत या तिन्ही महिला प्रवाशांना मदत मिळावी यासाठी शकूर सुर्वे नामक तरुणाने आपल्या ट्विटर अकाउंट वरून कोकण रेल्वेकडे मदतीसाठी ट्विट केले. मदतीसाठी केलेले हे ट्विट शकूर सुर्वे यांनी रेल्वे मिनिस्ट्री तसेच रेल सेवा यांनाही टॅग केले. कोकण रेल्वेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत याची तातडीने दखल घेत पुढील काही वेळात उपाययोजना केली.
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने ज्या कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये एकीकडे पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोबतीला कोणी नाही, अशी देखील परिस्थिती असल्याचे या उदाहरणांनी दाखवून दिले आहे.



