Vande Bharat Express | मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची दुसरी फेरी हाऊसफुल्ल!
५३० आसनांपैकी रत्नागिरी, खेडला केवळ २६ जागांचा कोटा
रत्नागिरी : मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर या गाडीच्या मडगाव ते मुंबई या दि. १ जुलै २०२३ रोजी होणाऱ्या दुसऱ्या नियमित फेरीला देखील उदंड प्रतिसाद लाभला आहे. १ जुलैची मुंबईच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ही गोव्यातील दोन थांबे तसेच कणकवलीमधूनच जवळपास प्रवाशांनी भरून मुंबईच्या दिशेने धावणार आहे.
शुक्रवारी रात्री अकरा वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार या गाडीच्या एकूण ५३० आसनांपैकी चेअरकारची ८ तर एमसीक्यूटिव्ह चेअर कारची ५ अशी फक्त तेराच आसने आरक्षित व्हायची शिल्लक होती. मडगाव मुंबई सीएसटी (22230 ) ही गाडी उद्या १ जुलै रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी गोव्यातील मडगाव मधून मुंबईसाठी सुटणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या सीट्स देखील आरक्षण होतील, अशी स्थिती आहे.
रत्नागिरी खेडला केवळ 22+4 इतक्याच आसनांचा तुटपुंजा कोटा
कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला अप दिशेला रत्नागिरी तसेच खेडकरिता चेअर कारच्या 22 तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या अवघ्या चारच आसनांचा कोटा देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी खेड मधून मुंबईच्या दिशेने जाताना 22 +4= 26 सीटचे आरक्षण झाले की त्यापुढील आरक्षण वेटिंगवर जाते. त्यामुळे रत्नागिरी तसेच खेडसाठी किमान ७० ते १०० आसनांचा कोटा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
हे सुद्धा वाचा : वंदे भारत’ कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील तीनच दिवस धावणार तरीही सहा दिवस दिसणार!काय आहे यामागील नेमकं कारण?